एकाच वर्षात दोन पराभव पचवले, तळ कोकणात राणेंच्या राजकारणाचे पुनरुज्जीवन
Maharashtra Assembly Election 2024 : नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव. साधा शिवसैनिक, नगरसेवक, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री आणि आता खासदार अशा अनेक पदांवर नारायण राणे यांनी काम केले. एकाच वर्षात दोन पराभव पचवले. पुत्राचे दोन पराभव पचवले. तळ कोकणात असलेले राणे यांचे वर्चस्व जवळपास संपुष्टात आले होते. पण पुन्हा एकदा भरारी घेऊन राणे यांनी तळ कोकणात स्वतःच्या राजकारणाचे पुनरुज्जीवन केले आहे.
नारायण राणे यांच्या राजकारणाची पडझड 2014 साली सुरू झाली. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतः नारायण राणे यांना कुडाळ मालवण मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. मात्र याच निवडणुकीत शेजारच्या मतदारसंघातून त्यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले.

त्यानंतर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत नारायण राणे यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून राणे यांचा राजकारणाला उतरती कळा लागली. या काळात राणे यांचे कट्टर विरोधक असलेले दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
यथावकाश राणे यांनी काँग्रेस सोडली आणि स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर लढले पण तिथेही त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसातच राणे यांनी स्वाभिमान पक्ष विसर्जित केला आणि भाजपकडून राज्यसभा खासदार म्हणून ते संसदेत गेले. त्यांना भाजपने केंद्रात मंत्री देखील केले. त्यांचे धाकटे पुत्र नितेश राणे भाजपच्या तिकिटावर कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. 19 साली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. अक्षरशः जेवणाच्या ताटावरून उचलून त्यांना अटक करण्यात आली. 2014 ते 2024 हा काळ राणे यांच्यासाठी खूपच त्रासाचा होता.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांचे ग्रह पुन्हा बदलले. भाजपच्या तिकिटावर नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. गेल्या दहा वर्षापासून कोणत्याही पदाशिवाय असलेले आणि दोन पराभवांची चव चाखलेले प्राण्यांचे जेष्ठ पुत्र निलेश राणे शिवसेनेच्या तिकिटावर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले तर धाकटे पुत्र नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघ सलग तिसऱ्या वेळी जिंकला. याच वर्षात राणे यांचे एकेकाळी कट्टर विरोधक असलेले दीपक केसरकर पुन्हा त्यांचे मित्र झाले. आणि राणे यांनी आपली संपूर्ण यंत्रणा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांच्यासाठी राबवली आणि केसरकर देखील निवडून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता तिन्ही आमदार महायुतीचे आहेत. नारायण राणे खासदार आहेत. त्यांचे दोन पुत्र आमदार आहेत. राज्यात शिवसेना भाजपचे सरकार येणार हे निश्चित आहे. एका अर्थाने राहणे यांच्या राजकारणाचे तळकोकणात पुनरुज्जीवन झाले आहे.












Click it and Unblock the Notifications