संघर्षाचे दुसरे नाव : आमदार संजय गायकवाड; 35 वर्षांच्या संघर्षानंतर खेचून आणली आमदारकी
Struggle story of MLA Sanjay Gaikwad : रस्त्यावर उतरून सामान्य माणसाची छोटी छोटी कामे करणे आणि तळागाळातील नागरिकांसाठी राबणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे वैशिष्ट्य असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आखून दिलेली सामाजिक कार्याची चौकट प्रत्येक शिवसैनिकाकडून कसोशीने पाळली जाते. आणि त्याचे राजकीय लाभ आपसूक शिवसैनिकाच्या पदरात पडतात. अर्थात काही शिवसैनिकांना लवकर यश मिळते तर काही शिवसैनिकांना यश मिळवण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष करावा लागतो. तब्बल 35 वर्षे प्रदीर्घ संघर्ष करून आणि शिवसेनेसारख्या पक्षात काम करून आमदारकीचा टिळा कपाळी लागलेल्या अस्सल शिवसैनिकाचे नाव म्हणजे आमदार संजय गायकवाड.
बुलढाणा हा पश्चिम विदर्भातील महत्त्वाचा जिल्हा. मराठवाड्या पाठोपाठ बुलढाणा जिल्ह्याने शिवसेनेला प्रचंड पाठबळ दिले. असंख्य तरुण शिवसैनिक या जिल्ह्यातून तयार झाले आणि त्यांनी लोकांची सेवा केली. त्यातले महत्वाचे नाव म्हणजे संजय गायकवाड. संजय गायकवाड यांचा आमदारकी पर्यंतचा प्रवास तसा सहज साधा आणि सोपा नाही. प्रस्थापित घराण्याचे पाठबळ नाही, हाती पुरेसा पैसा नाही तरीही फक्त सामाजिक कामाच्या जोरावर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांनी राजकीय यश मिळवले आहे. म्हणून ते विशेष उल्लेखनीय आहे.

बाळासाहेब ठाकरे या नावाचे गारुड
बाळासाहेब ठाकरे या नावाचे गारुड संजय गायकवाड यांच्या मनावर पहिल्यापासून कायम होते. बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊनच संजय गायकवाड यांनी लोकांची छोटी छोटी कामे करण्यास सुरुवात केली. बुलढाणा शहरात त्यांना स्थानिक जनतेचे पाठबळ मिळाले. तब्बल 28 वर्षे त्यांनी बुलढाणा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले. यादरम्यान सभापती आणि स्वीकृत सदस्य म्हणूनही काम करण्याची संधी संजय गायकवाड यांना मिळाली. नगरपालिकेत काम करत असतानाच गायकवाड यांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती आणि 1999 साली प्रथमच ते अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. मात्र अवघ्या 5000 मतांचे दान त्यांच्या पदरात पडले. पण त्यांनी संघर्ष सोडला नाही आणि लोकसेवेचा वसा टाकला नाही. ते सतत कार्यरत राहिले. 2004 च्या निवडणुकीत देखील त्यांनी विधानसभा प्रवेशाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा पराभव झाला खरा, पण त्यांच्या मतांमध्ये तब्बल सहा पटीने वाढ झाली होती आणि त्यांची मते झाली होती 32000.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वातही काम
2009 साली गायकवाड रिंगणात उतरले नाहीत. त्या काळात ते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धुरा सांभाळत होते. त्यांनी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली. अंगावर केसेस घेतल्या. धर्मांतराचे अनेक प्रयत्न हाणून पडल्याचा दावा संजय गायकवाड नेहमी करतात. 2014 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली यावेळी 35 हजार मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने त्यांनी राजकारणात सुरुवात केली. पदरी सतत पडणारे पराभव पाहून एखाद्याची हिंमत खचली असती पण विजय मिळेपर्यंत थांबायचेच नाही, असा निश्चय संजय गायकवाड यांनी केला होता. प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ यांच्या जोरावर संजय गायकवाड यांनी अक्षरशः झंझावात निर्माण केला आणि विलक्षण ताकदीने काम करून 2019 आली विधानसभेची उमेदवारी मागितली.
संधीचे केले सोने
संजय गायकवाड यांचे काम, कष्ट आणि मेहनत पाहून शिवसेनेने त्यांना संधी दिली आणि तब्बल 35 वर्षांची तपश्चर्या फळाला आली. बुलढाण्याच्या जनतेने प्रचंड मताधिक्याने संजय गायकवाड यांना विजयी केले. अवघ्या 5000 मतांनी १९९९ साली = विधानसभेची सुरुवात करणाऱ्या संजय गायकवाड यांना 2019 च्या निवडणुकीत 67 हजार मते मिळाली होती. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यश पदरी पडले होते. आमदारकीची पाच वर्षे जनतेच्या सेवेसाठी समर्पित करीन असा मनोदयच त्यांनी विधानसभेच्या पहिल्या विजयानंतर व्यक्त केला होता.
विकासाच्या योजना खेचून आणल्या
गेल्या पाच वर्षात सातत्याने पाठपुरावा करून बुलढाण्यात संजय गायकवाड यांनी विकासाच्या अनेक योजना अक्षरशः खेचून आणल्या. मतदारसंघात शिक्षण क्षेत्राच्या संदर्भातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. बुलढाणा येथे पदवी महाविद्यालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यासाठी आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यातून निधी मंजूर झाला आहे. शासकीय कृषी महाविद्यालयाची पायाभरणी देखील संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यातूनच पूर्ण झाली आहे.
तुकाराम महाराज वारकरी भवन
बुलढाणा हा धार्मिक परिसर आहे. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज वारकरी भवनांची उभारणी बुलढाणा येथे करण्यात आली. त्याचे उद्घाटन अलीकडेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाच्या अनुयायांना धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी या भवनाच्या माध्यमातून हक्काचे स्थान उपलब्ध झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची उभारणी
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आणि हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे. संजय गायकवाड यांनी आपल्या पाठपुराव्यातून बुलढाणा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची उभारणी केली. मतदार संघात बौद्ध समाजाची संख्या लक्षणीय आहे. यांच्यासाठी 77 बौद्ध विहार सभागृहे संजय गायकवाड यांनी उपलब्ध करून दिली. बुलढाणा येथे अत्याधुनिक कार्डियाक केअर सेंटर संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यातून उभारण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यातूनच जिल्हा लॅबोरेटरी बुलढाणा येथे उभारण्यात येत आहे.
आता दुसरी संधी
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा संजय गायकवाड यांना बुलढाण्यातून उमेदवारी दिली आहे. 35 वर्षे सामान्य जनतेसाठी झटणाऱ्या गायकवाड यांचा लोकसेवेचा अनुभव प्रचंड दांडगा आहे. पराभवाने खचून न जाता गायकवाड यांनी जिगरबाजपणे लढत दिली आणि यशश्री अक्षरशः खेचून आणली. या जिद्दीच्या जोरावरच संजय गायकवाड पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश करतील असा ठाम विश्वास बुलढाण्यातील शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.












Click it and Unblock the Notifications