शरद पवार लवकरच महायुतीत सहभागी होणार; मंत्र्याच्या दाव्याने राजकारणात वाढली चर्चा
शरद पवार व अजित पवार या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन होणार, या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. मात्र असे झाले तर, शरद पवार हे महायुतीत येणार की अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. मात्र आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार हेच महायुतीत सहभागी होतील, असा दावा योगेश कदम यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले योगेश कदम?
एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मंत्री योगेश कदम यांनी अनेक मुद्यांना हात घातला. शरद पवार व अजित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर कदम म्हणाले, "राष्ट्रवादी शरद पवार गट हा महायुतीत सामील होऊ शकतो. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये याच संदर्भात अनेक बैठका झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार महायुतीच्या वाटेवर आहेत. महाविकास आघाडीचा प्रत्येक पराभूत आमदार महायुतीसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे," असाही दावाही त्यांनी केला.
सामंतांबाबतही व्यक्त केली अपेक्षा
योगेश कदम यांनी रत्नागिरीचा पालकमंत्री कोण होणार, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी योगेश कदम यांनी तत्काळ आपल्या मनातील नाव सांगितलं. ते म्हणाले, "मी यापूर्वी सांगितलंय की, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळावे. उदय सामंत हे सीनियर नेते आहेत. उदय सामंत माझ्यासाठी मोठे भाऊ आहेत. आमच्यात कोणत्याही वाद नाही. योगेश कदम यांनी ड्रग्जच्या कारवाईवरही माहिती दिली. ते म्हणाले, "ड्रग्जची आंतरराष्ट्रीय रॅकेटपर्यंत पोहोचायचं आहे. 8 जानेवारीला पोलीस प्रशासनाचा आढावा घेणार आहोत. स्वतः ग्राउंडवर उतरून यावर कारवाई करायला लावणार आहे", अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.












Click it and Unblock the Notifications