छ.शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण: चेतन पाटीलला अटक, जयदीप आपटे अद्यापही फरार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच या दुर्घटनेनंतर विरोधकांनीही आक्रमक पावित्रा घेतला आहे. पुतळा कोसळल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार असलेला आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी चेतन पाटीलवर मालवण पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे फरार झाले होते. पोलिसांनी चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठमधील घरी चौकशी केली. यानंतर त्याला कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. आता चेतन पाटीलला मालवण पोलीस स्टेशनला आणले जाणार असून तिथे त्याची कसून केली जाणार आहे.

कोण आहे चेतन पाटील?
डाॅ. चेतन पाटील हा एका शैक्षणिक संस्थेत मागील 14 वर्षांपासून कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने पीएडी पदवी संपादन केली आहे. चेतन पाटील बांधकाम सल्लागार म्हणून सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम करत होता.
पाटील याच्या दाव्यानुसार, पुतळ्यासाठी जे फाऊंडेशन (चबुतरा) उभारला होता. त्याचे डिझाईन त्याने नौदलाला तयार करुन दिले होते. यापलीकडे त्याला नौदलाकडून कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र प्राप्त झालेले नाही. महाराजांच्या पुतळ्याचं काम ठाण्यातील कंपनीनं केल्याचे पाटील याने स्पष्ट केलं होते
जयदीप आपटे फरार
तर दुसरीकडे याप्रकरणातील दुसरा आरोपी जयदीप आपटे हा सध्या फरार आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट ठाण्यातील जयदीप आपटे या तरुणाला देण्यात आले होते. तो कल्याणमध्ये राहत आहे. जयदीप आपटेची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले, मात्र त्याच्या घराला कुलूप आहे. यानंतर पोलिसांनी माहेरी गेलेल्या जयदीप आपटे याच्या पत्नीची चौकशीही केली मात्र अजून तरी त्याचा सुगावा लागलेला नाही.












Click it and Unblock the Notifications