सुहास कांदे; भुजबळांना भिडणारा शिवसैनिक, नांदगावमध्ये विक्रमी विकासकामे
आक्रमक कार्यकर्ते हेच शिवसेनेचे खरे भांडवल आहे. गेल्या 58 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत वेगवेगळ्या टप्प्यावर शिवसेनेला असे आक्रमक कार्यकर्ते मिळत गेले आणि त्यांनी शिवसेनेचा आपापल्या भागात विस्तार केला. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला भेटलेला असाच एक कार्यकर्ता म्हणजे नांदगावचे विद्यमान आमदार सुहास कांदे.
सुहास कांदे हे तसे छगन भुजबळ यांच्या तालमीत वाढलेले कार्यकर्ते. पण नंतर त्यांची गोपीनाथ मुंडे यांच्याशी सलगी झाली. भुजबळ यांच्याशी नाशिकमध्ये त्यांचा बेबनाव वाढत गेला आणि कांदे यांनी अन्यत्र आश्रय शोधायला सुरुवात केली. ते शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांना संघटनेने जिल्हाप्रमुख पद बहाल केले. जिल्हाप्रमुख होताच कांदे यांनी नाशिकमध्ये संघटनेची जोरदार बांधणी केली. जिल्हा बँक, जिल्हा मजदूर संघ, बाजार समित्या अशा अनेक ठिकाणी त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी मिळवून दिली. अनेक वर्षांपासून ते विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करीत होते. 2014 साली त्यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली पण त्यांना पंकज भुजबळ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. आणि 2019 मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली.

नांदगाव येवला हा परिसर म्हणजे छगन भुजबळ यांची एकाधिकारशाही असलेला परिसर. त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण निधड्या छातीच्या सुहास कांदे यांनी हे आव्हान स्वीकारले आणि भुजबळ यांना जोरदार टक्कर दिली. . छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा त्यांनी दणदणीत पराभव केला आणि सुहास कांदे 2019 साली पहिल्यांदा विधानसभेत आले.
एकनाथ शिंदे यांच्याशी सलगी
शिवसेनेच्या अनेक आमदारांप्रमाणेच सुहास कांदे यांचीही एकनाथ शिंदे यांच्याशी अधिक सलगी होती. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सुहास कांदे यांनी शिंदे यांना साथ दिली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले आणि वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झाला. भुजबळ सत्तेत आले मग सुहास कांदे यांचे काय होणार? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर होता. पण सुहास कांदे यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी भर सभागृहात दिली. आताही 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदे यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी दिली आहे.
असंख्य विकासकामे
संघटना बांधणीत स्वतःला सिद्ध केलेल्या सुहास कांदे यांनी आमदारकी देखील विकासकामाने गाजवून दाखवली. नांदगाव विधानसभा मतदारसंघात असंख्य विकास कामे सुहास कांदे यांच्या पुढाकारातून तडीस नेण्यात आली. व त्यांच्या पुढाकारातूनच माणिकपुंज डॅम चे उद्घाटन 30 सप्टेंबर रोजी नांदगाव मध्ये करण्यात आले. या डॅममुळे पन्नास वर्षांचा पाणी प्रश्न संपुष्टात आला असून सिंचन, पिण्यासाठी आणि पुरनियंत्रणासाठी या धरणाचा उपयोग होणार आहे. अलीकडेच नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन देखील करण्यात आले. सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवसृष्टी सध्या शिवप्रेमींच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे.
मनमाड ते नांदगाव मोफत बससेवा
सुहास कांदे यांच्या पुढाकारातूनच मनमाड ते नांदगाव ही मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा लाभ होत आहे. रोजगारासाठी ये जा करणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्याचा विशेष लाभ होत आहे. दररोज सुमारे 5000 नागरिक या बस सेवेचा लाभ घेत आहेत. नांदगाव विधानसभा मतदारसंघात 20 हून अधिक खेड्यांमध्ये सुहास कांदे यांच्या पुढाकारातून सभागृहे उभारण्यात आली आहेत. शोहरा, येगाव आणि मेहुणे अशा मोठ्या गावातील नागरिकांना याचा लाभ होणार आहेच, त्याशिवाय चौकट पाडा परिसरातील आदिवासी बांधवांसाठी ही अशा सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे.
हजारो कोटींचा निधी खेचून आणला
सुहास कांदे यांच्या पुढाकारातूनच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य गावातील रस्ते सिमेंट आणि काँक्रीटचे करण्यात आले असून ही गावे नांदगाव शहराशी जोडण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षात म्हणजेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून रस्ते कॉन्क्रीटीकरणास प्राधान्य देण्यात आले असून नांदगाव विधानसभा मतदारसंघाला त्याचा मोठा लाभ होत आहे. सिमेंट आणि काँक्रीटचे रस्ते असल्यामुळे वाहतुकीसाठी सुलभता आली असून शेतकऱ्यांना शेतमाल त्वरेने शहराकडे नेणे शक्य झाले आहे. याशिवाय अन्य महत्त्वाची विकास कामे देखील सुहास कांदे यांच्या पुढाकारातून नांदगाव विधानसभा मतदारसंघात राबवण्यात आली आहेत. हजारो कोटी रुपयांचा निधी सुहास कांदे यांनी अक्षरशः आपल्या मतदार संघात खेचून आणला आहे. नांदगाव शहर पाणीपुरवठा योजनेचे काम देखील सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून सुरू झाले आहे
यावेळी तिरंगी सामना
सुहास कांदे यांची मतदारसंघावरील पकड पक्की आहे. लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भारतीय पवार यांचा पराभव झालेला असला तरी सुहास कांदे यांच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात त्यांना चाळीस हजारांचे मताधिक्य मिळाले आहे, ही सुहास कांदे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. 2024 आली विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुहास कांदे यांना संधी दिली असून महाविकास आघाडीचे गणेश धात्रक आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी त्यांचा सामना होत आहे. आपल्या विकास कामांच्या आणि संघटनेच्या जोरावर सुहास कांदे पुन्हा विधानसभेत प्रवेश करतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.












Click it and Unblock the Notifications