पवार ते पवारच..! संभाजीराजे व मोदींना काढले 'चिमटे'; म्हणाले, माझी झोपंच उडाली...
Sharad Pawar : शरद पवार शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. तेथे सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांसमोर त्यांनी संभाजीराजे छत्रपतींपासून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आपल्या स्टाईलने धुतले. काही कळीच्या मुद्द्यांवर मिश्किल टिप्पणी करत टोलेबाजीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांबाबत खोचक वक्तव्य केलं. मोदींना सल्लाही दिला. तिसऱ्या आघाडीवर बोलतानाही त्यांनी संभाजीराजांना टोलाही लगावला.

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून टोलेबाजी
महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शरद पवारांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिले. ते म्हणाले, "एक म्हण आहे. मी हे जातीय बोलतोय असं समजू नका. बाजारात तुरी, भट भटणीला मारी... कशाचा काही पत्ता नाही, आणि आजच त्याची चर्चा. अजून निवडणुका व्हायच्या आहेत. बहुमत मिळालं, तर नेता निवडतील. नेता निवडला तर मुख्यमंत्री होईल. जयंत पाटील कधी असं बोलतात का? त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे", असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
नरेंद्र मोदींनाही लगावला टोला
पत्रकार परिषदेत मोदी व अमित शहांच्या महाराष्ट्रात वाढलेल्या दौऱ्यांबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी भाजपच्या या दोन्ही नेत्यांना चिमटे काढले. पवार म्हणाले, महाराष्ट्रात पंतप्रधानांनी लोकसभेवेळी १८ ठिकाणी सभा घेतल्या. त्यातल्या १४ ठिकाणी त्यांचा पराभव झाला. असं होत असेल, तर आमची विनंती आहे की पंतप्रधानांनी विधानसभेत जास्त वेळा महाराष्ट्रात यावं. इथे आणखी सभा घ्याव्यात"!
छत्रपती संभाजीराजेंना काढला चिमटा
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडीही रिंगणात उतरली आहे. यामध्ये संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी व बच्चू कडू यांचा समावेश आहे. प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे हेही उतरणार आहेत. यासंदर्भात शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, "जेव्हा लोक एकत्र येतात, तेव्हा त्यांचा परिणाम होतोच. संभाजीराजे वगैरे एकत्र आल्यामुळे नक्कीच परिणाम होणार आहेत. त्यामुळे आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता आपलं काय होणार, असा प्रश्न आम्हाला पडला आहे", असं पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.












Click it and Unblock the Notifications