निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का; 'हा' विश्वासू शिलेदार घेणार राजकारणातून संन्यास!
राज्यात सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुण्यातही राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' गटाला एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.

सोशल मीडियावर 'आता विसावू या वळणावर...' या शीर्षकाखाली एक भावूक पोस्ट लिहित त्यांनी आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तीन टर्म नगरसेवक आणि 'स्थायी'चे अध्यक्षपद
विशाल तांबे हे पुणे महापालिकेतील एक अभ्यासू आणि वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. धनकवडी परिसरातून त्यांनी सलग तीन वेळा (२००७, २०१२ आणि २०१७) विजय मिळवला होता. केवळ नगरसेवक म्हणूनच नाही, तर पुणे महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी यशस्वीपणे भूषवले होते. सुमारे १९ वर्षे त्यांनी महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे.
"कुठेही नाराजी नाही, पण आता थांबण्याची वेळ आलीये"
आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना तांबे म्हणाले की, "मी आगामी महानगरपालिका निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या या निर्णयामागे कोणत्याही प्रकारची पक्षीय नाराजी नाही. मी गेली अनेक वर्षे सातत्याने काम करत आलो आहे, पण आता थांबणे गरजेचे वाटते." विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी, अशी भूमिका त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे मांडली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
धनकवडीकरांसाठी लिहिली भावूक पोस्ट
विशाल तांबे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये धनकवडी परिसरातील नागरिकांशी असलेले आपले नाते अधोरेखित केले आहे. त्यांनी म्हटले की:
"धनकवडी हे केवळ माझे कार्यक्षेत्र नसून माझे विस्तारित कुटुंब आहे. गेल्या ३० वर्षांपासून मी या परिसराशी जोडला गेलो आहे. विद्यार्थी दशेपासून सुरू झालेला हा सामाजिक कार्याचा प्रवास आज एका वळणावर आला आहे. तुमच्या प्रेमाच्या ऋणातून मला मुक्त व्हायचे नाही, तर त्या आठवणी हृदयात जपायच्या आहेत."राष्ट्रवादीसाठी (Sharad Pawar Group) मोठा तोटा?
ऐन निवडणुकांच्या तोंडावर एका अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या नेत्याने निवडणुकीतून माघार घेणे, हा शरद पवार गटासाठी पुण्यात मोठा फटका मानला जात आहे. तांबे यांच्या निर्णयामुळे धनकवडी परिसरात आता राष्ट्रवादी कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications