"धनुष्यबाणाचे बटण दाबा, स्वर्गात जागा मिळवा"; शिवसेना नेते शहाजीबापूंचा अजब दावा
Shahajibapu Patil Controversial Statement : आपल्या रांगड्या भाषेमुळे आणि "काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल" या संवादामुळे राज्यभरात प्रसिद्ध झालेले शिवसेना (शिंदे गट) नेते आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा आपल्या अजब विधानामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट अध्यात्म आणि राजकारणाची सांगड घालत सांगोल्याच्या सभेत उपस्थितांना 'स्वर्गाचा रस्ता' दाखवला आहे.

"धनुष्यबाण बटण दाबा, स्वर्गात जागा मिळवा"
सांगोल्यात आयोजित एका जाहीर सभेत बोलताना शहाजीबापू पाटील यांनी एक अजब दावा केला. ते म्हणाले, "मी तुम्हाला खात्रीने सांगतो. ज्यांनी ज्यांनी निवडणुकीत धनुष्यबाणाचे बटण दाबले आहे. त्यांना स्वर्गातच जागा मिळणार आहे. त्यांना देव नरकात घेणारच नाही. तुम्ही स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री बापू देतो.
एवढ्यावरच न थांबता त्यांनी विरोधकांवरही तडाखा ओढला. ज्यांनी विरोधकांची बटणे दाबली आहेत, त्यांचं काही खरं नाही. त्यांच्यात आता रामच उरला नाही," असे म्हणत त्यांनी मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला.
भाकरीत साप पाळला होता; साळुंखेंवर जहरी टीका
यावेळी शहाजीबापूंनी त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी दीपक साळुंखे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. विधानसभा निवडणुकीतील आपल्या पराभवाचा संदर्भ देत बापू म्हणाले, "मी भाकरीत साप पाळला होता, म्हणूनच मला पराभवाचा फटका बसला.
स्वतःला 'किंग मेकर' समजणाऱ्या साळुंखे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, "दीपक साळुंखे म्हणतात मी जिथे जाईल तिथे गुलाल असतो. पण ते 'पांढऱ्या पायांचे' आहेत. ते ज्यांच्याकडे जातील, त्यांचा पराभव निश्चित आहे."
भाजपला इशारा: "सन्मान ठेवा, अन्यथा आम्ही स्वतंत्र वाट धरू"
महायुतीमध्ये असूनही शहाजीबापूंनी भाजपला टोला लगावण्याची संधी सोडली नाही. सांगोला मतदारसंघ हा २०१४ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगत त्यांनी भाजपला स्पष्ट इशारा दिला.
"तुम्ही आमचा सन्मान ठेवा, आम्ही तुमचा कोणताही शब्द खाली पडू देणार नाही. पण जर तुम्ही तसे केले नाही, तर आम्ही पुन्हा आमच्या एकट्या वाटेने जाऊ," असे खडे बोल त्यांनी सुनावले. तसेच, "जर तुम्ही मागील निवडणुकीत आमचे ऐकले असते, तर आज सत्तेत निम्मे भागीदार असता," असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.












Click it and Unblock the Notifications