Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हिंदी सक्ती म्हणजे अन्याय!, मुख्यमंत्री कुठल्या भाषेत शिकले? सयाजी शिंदेंचा खडसावणारा सवाल

महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवर हिंदी शिकण्याची सक्ती लादण्याच्या निर्णयावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे. "आमचं गाव मराठी, आमची भाषा मराठी, आमचा जिल्हा मराठी, आणि आमचं राज्यसुद्धा मराठी मग आमच्या मातृभाषेला बाजूला ठेवून हिंदीचं वर्चस्व का?" असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Sayaji Shinde

ABP माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, राज्यातील काही शाळांमध्ये लहान वयातच मुलांवर हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे, जी त्यांच्या मते अत्यंत चुकीची आहे. "मुख्यमंत्री स्वतः कोणत्या भाषेत शिकले? मराठीतच ना? मग त्यांनी मराठी भाषेलाच प्रथम प्राधान्य द्यायला हवं," असं ते ठामपणे म्हणाले.

"हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्या" शिंदेंची स्पष्ट भूमिका

"मी मराठी माध्यमातून शिकलेलो आहे. माझ्या मराठी शिक्षणामुळेच आज मी इथवर पोहोचलो. मराठीमध्ये इतकं समृद्ध वाङ्मय आहे, जे दुसऱ्या कोणत्याही भाषेत नाही. मग लहान मुलांवर तिसऱ्या, चौथ्या वर्गात हिंदी शिकण्याची जबरदस्ती का केली जाते?" असे सयाजी शिंदे यांनी विचारले.

त्यांनी असंही सांगितलं की, "मी 12 भाषांमध्ये काम करतो, पण सगळं मी आधी मराठीत लिहून घेतो आणि त्यातूनच समजून घेतो. आपली विचारशक्ती ज्या मातृभाषेत विकसित होते, तीच आपल्यासाठी खरी शिकवण असते. हिंदीवर प्रेम करणं वेगळं, पण ते लादणं चुकीचं आहे. मुख्यमंत्री असोत, की भाषाशास्त्रज्ञ सर्वांनी यावर विचार करायला हवा."

"घटनेत हिंदी राष्ट्रभाषा नाही" शिंदेंचा दावा

सयाजी शिंदे यांनी पुढे स्पष्ट केलं की, भारतीय संविधानात हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आलेलं नाही. "भारतामध्ये 18 प्रमुख भाषा अधिकृत भाषांमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाच्या अजेंड्यानुसार हिंदीची सक्ती करणं चुकीचं आहे. प्रत्येक राज्याने आपल्या भाषेला सन्मान द्यावा, पण इतरांवर ती थोपवू नये," अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

मराठी शाळांबाबत चिंता आणि ग्रामीण संस्कृतीचं महत्त्व

सयाजी शिंदे यांनी जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थितीही अधोरेखित करत ती गंभीर असल्याचं नमूद केलं. "लहानपणी इंग्रजी येत नाही म्हणून आम्हाला हिणवलं जायचं, पण माझा दृष्टिकोन वेगळा होता. माझ्या आईवडिलांनी मला जे मूल्य शिकवलं - त्यात कुठेही अश्लीलता नव्हती, ना जातपात होती," असं त्यांनी भावूकपणे सांगितलं.

"मुख्यमंत्र्यांनी मराठीला प्राधान्य द्यावं"

आपल्या मताच्या अखेरीस ते म्हणाले, "आज जर मुख्यमंत्री मराठीत शिकले असतील, तर त्यांनी त्या भाषेला सन्मान दिला पाहिजे. तिसरी सक्तीची भाषा ही पाचवी किंवा सहावीनंतर शिकवावी, पण लहान वयात लादू नये."

सयाजी शिंदेंच्या या परखड मताने राज्यातील हिंदी सक्तीच्या धोरणावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा आवाज केवळ एका कलाकाराचा नसून, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+