Satara Drugs Case : साताऱ्यात 6 हजार कोटींचा 'ड्रग्ज' धमाका! कराडमध्ये DRI चा छापा, कारवाई कशी?
Satara Drugs Case : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात अंमली पदार्थांच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स (DRI) विभागाने पाचपुतेवाडी येथे छापा टाकून तब्बल ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे केवळ सातारा जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

तीन IPS अधिकारी आणि ६ हजार कोटींचे ड्रग्ज
मिळालेल्या माहितीनुसार, कराड जवळील पाचपुतेवाडी येथील एका संशयास्पद शेडवर DRI च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. या कारवाईचे गांभीर्य इतके मोठे होते की, स्वतः तीन आयपीएस (IPS) अधिकारी या मोहिमेचे नेतृत्व करत होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ६ हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
'महाराष्ट्र केसरी' खून प्रकरणाचा कनेक्शन
या कारवाईत धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी ड्रग्जची निर्मिती सुरू होती, तो कारखाना बाबा मोरे याचा असल्याची माहिती समोर आली आहे. बाबा मोरे हा 'महाराष्ट्र केसरी' संजय पाटील खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. DRI पथकाने त्याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी जोडलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्थानिक पोलीस अनभिज्ञ; शेड सील
विशेष म्हणजे, इतकी मोठी कारवाई होऊनही सातारा आणि कराड स्थानिक पोलीस याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. DRI च्या पथकाने ही मोहीम अत्यंत गोपनीय ठेवली होती. सध्या पाचपुतेवाडीतील संबंधित शेड सील करण्यात आले असून, तिथे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने आणि यंत्रणा जप्त करण्यात आली आहे.
साताऱ्यात ड्रग्जचा विळखा वाढतोय?
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
- डिसेंबर २०२५: मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करून ड्रग्जचा साठा जप्त केला होता.
- जानेवारी २०२६: आता कराडमध्ये DRI ने ६ हजार कोटींची कारवाई केली.
- एकामागून एक होणाऱ्या या कारवायांमुळे साताऱ्याच्या दुर्गम भागात ड्रग्जचे कारखाने तर सुरू झाले नाहीत ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.












Click it and Unblock the Notifications