संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड आला समोर; CIDच्या आरोपपत्रात थेट उल्लेख, खंडणी-हत्या एकच..
Santosh Deshmukh Murder Case update Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजले. या हत्या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याने यात पुढे नेमके काय होणार? देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
दरम्यान, या हत्या प्रकरणात मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याचा दाखल आरोपपत्रात आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे एक प्रकारे वाल्मिक कराडच या संपूर्ण हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे आरोपपत्रातून मांडण्यात आलेले आहे. चला तर जाणून घेऊया, आरोपपत्रात नेमक्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे...!

1) प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख
सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड याचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख आहे. एकूण आरोपींत वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक एक आहे. त्यानंतर आरोपपत्रात विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे.
2) कराडने फोनवरून मागितली खंडणी
आरोपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे 29 नोव्हेंबर रोजी आरोपी सुदर्शन घुले याच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता.
3) पाच साक्षीदारांची साक्ष
या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना सीआयडीला पाच महत्त्त्वाचे साक्षीदार सापडले आहेत. हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर सीआयडीने वाल्मिक कराडविरोधात सर्व पुरावे गोळा केलेले आहेत. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आला आहे.
4) कराडने घुलेला सांगितले कोणालाही सोडणार नाही
सात तारखेला सुदर्शन घुले याने वाल्मिक कराडला कॉल केला होता. त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन घुले याला सांगितले की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण कुणालाही सोडणार नाही. सुदर्शन घुले आणि कराड यांच्यात हा संवाद झाल्यानंतर घुले याने अवादा या कंपनीत परत कॉल केला आणि धमकी दिली, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आलेले आहे.
5) देशमुखला कायमचा धडा शिकवा
8 डिसेंबर 2024 तारखेला एकूण पाच साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले याच्यासोबत होता. नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती. या भेटीत विष्णू चाटे याने घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता. संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा संदेश होता, असे सीआयडीने दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद आहे.
चार्जशीटमध्ये कोणत्या क्रमांकावर कोण आरोपी, पाहा
- वाल्मिक कराड - एक नंबर
- विष्णू चाटे- दोन नंबर
- सुदर्शन घुले - तीन नंबर
- प्रतीक घुले - चार नंबर
- सुधीर सांगळे - पाच नंबर
- महेश केदार - सहा नंबर
- जयराम चाटे - सात नंबर
- फरार कृष्णा आंधळे - आठ नंबर
वेळेआधीच चार्जशीट दाखल
मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर 90 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची मुभा तपास एजन्सीला असते. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात केवळ 80 दिवसात चार्जशीट दाखल झाली. या संपूर्ण प्रकरणात पहिल्यांदा दाखल झालेला खंडणीचा गुन्हा हा ॲट्रॉसिटीशी सुसंगत होता.
ॲट्रॉसिटी चा मारहाणेशी आणि मारहाणीचा हत्येशी अशी गुन्ह्यांच्या साखळीचा मोठा उलगडा आरोप पत्रात झालाय. हे तीन गुन्हे एकमेकांपासून वेगळे असल्यास ते तर तीन चार्जशीट दाखल झाले असत्या मात्र सीआयडीने या तीनही प्रकरणांचा एकत्रित उल्लेख केला आहे.
काय होता संपूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रम, कशी झाली हत्या
- 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितल्याचे समोर आले. त्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल झाला.
- 6 डिसेंबरला संतोष देशमुख सुदर्शन घुले , प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद झाला. त्यानंतर संतोष देशमुख यांना जबर मारहाण झाली .मारहाणीच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आली होती.
- 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. हत्येचा गुन्हा वेगळा होता .या प्रकरणातील 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराडविरुद्ध पुरावे मिळाले. खंडणी दिली नाही म्हणूनच संतोष देशमुख यांना मारहाण झाली व त्यांची हत्या करण्यात आली हे स्पष्टपणे उघड झाल्याने या तीनही प्रकरणांचा एकत्रित उल्लेख आरोप पत्रात करण्यात आल्याने सारेच चित्र स्पष्ट झाले आहे.
- या आरोपपत्रामधून वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे वाल्मीक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेलेला आहे.












Click it and Unblock the Notifications