धस-मुंडे भेटीचे राजकारण तापलं; संजय राऊत म्हणाले-धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला
Sanjay Raut Attacks Suresh Dhas Over Santosh Deshmukh Case : भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यात झालेली भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच वातावरण तापले आहे. मुंडेविरुद्ध रान पेटवणाऱ्या धसांनी अचानक भेट घेतल्याने सर्व काही मॅनेज झालं का, असा सवाल आता राजकीय वर्तुळात रंगू लागला आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला.
एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. याचे वाईट वाटत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.
..तर हे सुरेश धसांचे फार मोठे पाप असेल
खासदार संजय राऊत म्हणाले की, जर सुरेश धस यांनी हे कृत्य केले असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही, त्यांना इतिहास क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा करून त्यांनी देशमुख कुटुंब यांच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर केवळ बीडची जनताच नाही तर राज्यातील जनता देखील लक्षात ठेवेल. हे खुप मोठे पाप असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. जर त्यांनी तसे केले असेल तर हे विश्वासघातापेक्षाही पुढचे पाऊल असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

सुरेश धस विश्वासाचा माणूस नाही
खासदार राऊत म्हणाले की, सुरेश धस यांच्या वरती विश्वास ठेवू नका, असे मला बीड मधील एका नेत्याने आधीच सांगितले होते. सुरेश धसे कधीही पलटी मारतील, असे तो नेता म्हणाला होता. धस, मुंडे आणि वाल्मीक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची असल्याचे बीडमधील लोकांनी मला सांगितले होते. मात्र, दुर्दैवाने हे सत्य होताना दिसत असल्याचे खासदार संजय राऊतांनी खंत व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंचा पक्ष अमित शहा यांच्या मालकीचा
एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहा यांच्या मालकीचा पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही. अमित शहा यांनी शिवसेनेचा एक गट फोडला, आणि तो गट शिवसेनेच्या ताब्यात दिला. तो अमित शहा यांचा पक्ष आहे. तो सध्या एकनाथ शिंदे यांना चालवायला दिला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, जे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत, शत्रू आहेत, तेच मराठी माणसा संदर्भात अशी भूमिका घेऊ शकतात, असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला संपवून टाका असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले होते. यावर राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.












Click it and Unblock the Notifications