महाराजांचा पुतळा तुटला नाही तोडला! संजय राऊतांचा आरोप, म्हणाले- फडणवीस हे पेशव्याचे उत्तराधिकारी!
Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis : "छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठा साम्राज्य लयाला घालवणा-या पेशव्याचे देवेंद्र फडणवीस हे उत्तराधिकारी आहेत. "'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला नाही तुम्ही तोडलात" असा गंभीर आरोप शिवसेना युबीटी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठच महिन्यांत कोसळला. यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तसेच विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर शरसंधान साधले आणि 'पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटीशांचा यूनियन जॅक फडकवला त्या पेशव्याचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत, हे दुर्देवाने म्हणावे लागेल असा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत आणि सरकार आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देण्यास विरोध करत आहात. मालवणमध्ये महाराजांचा पुतळा तोडला हे तुमचं पाप आहे. तुम्हीच तोडलात. तुटला नाही तोडलात", त्याचे भ्रष्टाचारी अजून मोकाट आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांना टोला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, "ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथांनी मराठा साम्राज्य लयास नेलं आणि सर्वात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटीशांचा यूनियन जॅक फडकवला त्या पेशव्याचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत. असे आम्हाला दुर्दैवाने म्हणावे लागले कारण त्याशिवाय त्यांनी अशी भाषा केली नसती.
तुमचे गुंड आम्हाला महाराजांचा इतिहास शिकवणार?
संजय राऊत म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणारे आजही मोकाट आहेत. त्यांना तुम्ही अटक करु शकत नाही. कारण ते तुमचे पेशवाईचे शिलेदार आहेत. शिवसैनिक जेव्हा मालवणला गेले, तेव्हा त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचे काम भाजपचे गुंड करत होते. तुम्ही त्यांचे समर्थक आहात.
पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे तुमचे गुंड महाराजांचा इतिहास शिकवणार? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात. वेगळा विदर्भ करणं हे तुमच्या मनात आहे की नाही?" असा प्रश्नही संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?", असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.












Click it and Unblock the Notifications