शिवरायांचा एकेरी उल्लेख, औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा; ठाकरेंचा शिलेदार अमित शहांवर भडकला
Sanjay Raut Attacks Amit Shah : अमित शहांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिला, तरी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या तोंडून ब्र शब्द देखील निघालेलं नाही, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी महाराजांची काल तिथीनुसार पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज देशाला आणि जगाला प्रेरणा देणारे आहेत, असे अमित शाह यांनी भाषणादरम्यान म्हटले. दरम्यान, अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. ते रविवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

.. मग दंगली का घडवल्या?
संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला जर औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर इतक्या हाणामारी आणि दंगली का घडवल्या? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याचा हा परिणाम आहे का? एवढं प्रेम.
महाराष्ट्राच्या शत्रूला हिंदुत्वाच्या शत्रूच्या थडग्याला समाधीच्या दर्जा देण्यासंदर्भात वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाजूला बसलेले असताना करतात. त्यांच्या वंशजांना या गोष्टीचा त्रास व्हायला हवा होता.
.तर देवाभाऊ, शिंदेंनी थयथयाट मांडला असता
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेबाची समाधी हा शब्द जर दुसऱ्या कुणाच्या तोंडून निघाला असता तर देवाभाऊ, आणि शिंदे या दोघांनी थयथयाट मांडला असता. अजित पवार संयमी आहेत. हिंदुत्वाचा कडेलोट झाला असे म्हटले असते पण काल यांच्या तोंडून काही निघाले नाही.
अमित शहांनी कालच्या भाषणामध्ये महाराजांचा एकेरी उल्लेख केला. हा शिवरायांचा अपमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. नकली हिंदुत्ववादी शिंदे गटाचे लोकं कुठे आहे. महायुतीमध्ये एकोपा आहे असे रायगडावरील कार्यक्रमात दिसून आले नाही. शिंदे गटाचे नेते स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला नव्हते.












Click it and Unblock the Notifications