'भिकार संपादक'-राज ठाकरेंचा निशाणा; संजय राऊत म्हणाले- आम्ही चाटूगिरी, चमकोगिरी करणारे लोक नाहीत
Maharashtra Assembly Elections 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी जमल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी विक्रोळी येथील सभेत बोलताना संजय राऊतांचा भिकार संपादक असा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला होता.
त्याला आता संजय राऊत यांनी सडेतोड शब्दात उत्तर दिले. ते ठाकरे असतील तर मी बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेला राऊत आहे. मुळात भाजपच्या नादी लागलेल्यांची मी तोंडी लागत नाही. चाटूगिरी अन् चमकोगिरी करणारे आम्ही लोक नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर जोरदार हल्लाबोल चढवत आहेत. काल राज ठाकरे यांची विक्रोळीत जाहीर सभा पार पडली. या सभेतून राज ठाकरेंनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. तसेच मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकणारा एक भिकार संपादक इकडे राहतो. त्यांना वाटतं की तोंड त्यांनाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना 'तुम दो मारो हम चार मारेंगे. घाण करुन टाकलं सगळं राजकारण! सकाळी उठायचं, यांना (प्रसारमाध्यमांना) धरायचं. संयम बाळगतोय याचा अर्थ गांxx समजू नये, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी संजय राऊत यांच्यावर केला. तर मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.
संजय राऊतांनी काय दिले प्रत्युत्तर?
राज ठाकरे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी देखील शनिवारी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले की, राज ठाकरे बोलतायत बोलू दे ना. भाजपाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, लूट करतायत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते, त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलय.
ते ठाकरे तर मी बाळासाहेबांचा राऊत
राऊत पुढे म्हणाले की, भाषेची शुद्धता स्वच्छ, शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी, महाराष्ट्राच्या शत्रूसाठी वापरायची. आम्ही ही चाटूगिरी, चमचेगिरी करणारे लोक नाहीत. राज ठाकरे काय बोलले, त्यात मला जायचं नाही. निवडणुका आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे. फडणवीसांच स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं, नाहीतर ईडीची तलवार आहेच, त्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची, काय बोलायचे आणि काय लिहायचे, याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.












Click it and Unblock the Notifications