Sanjay Rathod Age Biography : संजय राठोड पुन्हा एकदा बनले मंत्री!, घेतली शपथ, आता कोणते खाते मिळणार?
Sanjay Rathod Age Biography : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे दिग्रसचे आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांना संधी मिळाली आहे. पश्चिम विदर्भात शिवसेनेसाठी ज्या तरुणांनी प्रचंड काम केले त्यातले एक महत्वाचे नाव म्हणजे संजय राठोड असून त्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली आहे.
वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजय राठोड यांनी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. बाळासाहेबांचे नेतृत्व आणि संघटनेचा आवाका यामुळे ते शिवसेनेकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून निवडले गेले. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची भक्कम संघटनात्मक बांधणी संजय राठोड यांनी केली.

लक्षवेधी आंदोलने
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना अत्यंत आक्रमक आणि बेधडक शिवसैनिक अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. यवतमाळ मधील जवाहरलाल दर्डा विमानतळाला संत गाडगेबाबा विमानतळ हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठ आंदोलन केलं. या आंदोलनाने राज्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बघता बघता संजय राठोड यांनी यवतमाळच्या राजकारणात स्वतःचा असा दबदबा निर्माण करून घेतला. एकेकाळी यवतमाळ जिल्ह्यावर माणिकराव ठाकरे यांचे वर्चस्व होते. पण माणिकरावांच्या वर्चस्वाला संजय राठोड यांनी थेट शिंगावर घेतले. छोट्या छोट्या ग्रामपंचायतीवर देखील काँग्रेसची सत्ता होती पण बघता बघता संजय राठोड यांनी या विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004 साली तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.
सलग चार विजय
2009 मध्ये संजय राठोड यांच्या दारव्हा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यांचा दारव्हा हा मतदारसंघ रद्द होऊन दिग्रस मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात 2009 साली त्यांनी तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा जायंट किलर होण्याचा मान मिळवला. 2014 मध्ये सलग तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2014 साली सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात होते त्यामुळे संजय राठोड यांचा विजय अधिक महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीतून लढताना त्यांनी संजय देशमुख यांचे तगडे आव्हान लीलया मोडून काढले आणि ते साठ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आणि त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली.
बंजारा समाजात लोकप्रिय नाव
संजय राठोड ज्या दिग्रस मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघात बंजारा, कुणबी या समाजाचे वर्चस्व आहे. बंजारा समाजाची मते या मतदारसंघात नेहमीच निर्णायक राहिलेली आहेत. राठोड यांनी ही मते शिवसेनेच्या बाजूने फिरवली. ग्रामीण भागात शिवसेनेचे जबरदस्त संघटन उभे करणारा यवतमाळ मधील नेता म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहिले जाते. आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेले सामाजिक काम प्रचंड मोठे आहेत. जगद्विख्यात नेत्रचिकित्सक तात्या लहाने यांच्याकडून त्यांनी आपल्या मतदारसंघात नेत्रचिकित्सा शिबिर घेतले आणि हजारो लोकांच्या डोळ्यावर उपचार करून घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील त्यांनी मोठमोठे आंदोलने केली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
पोहरादेवी वस्तुसंग्रहालय
संजय राठोड यांच्या मदतीने वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे बंजारा विरासत वस्तुसंग्रहालय साकारण्यात आले आहे. दिग्रस येथे तब्बल 15 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. दारव्हा शहर हा संजय राठोड यांचा बालेकिल्ला आहे. या शहरात पाणीपुरवठा योजना संजय राठोड यांच्या अथक परिश्रमामुळे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शहरवासीयांना स्वच्छ पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी नेर, दारवा आणि दिग्रस या तीन तालुक्यात गारमेंट क्लस्टर सुरू केल्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला.












Click it and Unblock the Notifications