महिला डॉक्टर आत्महत्या: 'माजी खासदारांच्या PA चा दबाव होता!' प्रकाश आंबेडकरांचा 'हा' गंभीर आरोप
Sampada munde Suicide Prakash Ambedkar Demands CM Fadnavis : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता गंभीर राजकीय वळण लागले असून, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पीडित डॉक्टरच्या कुटुंबाने SIT (विशेष तपास पथक) चौकशीची मागणी केली असून, या मागणीला आंबेडकरांनी समर्थन जाहीर केले आहे. तसेच, माजी खासदारांच्या स्वीय सहाय्यक (PA) च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुख्यमंत्र्यांनी तातडीने खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

'माजी खासदारांच्या PA वर मुख्यमंत्र्यांनी दिली क्लिनचिट?'
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून अत्यंत परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्या 'X' (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये या प्रकरणातील गंभीर बाबींवर लक्ष वेधले आहे.
फलटण जि. सातारा येथे ज्या पद्धतीने एका डॉक्टर तरुणीला आत्महत्या करून आपला जीव गमवावा लागला, ते अत्यंत चीड आणणारे आहे.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 28, 2025
मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशीबद्दल खोटी माहिती सभागृहाला दिली व त्यावर कोणत्याही विरोधी पक्षाने ह्या खोट्या माहितीबद्दल मुख्यमंत्री विरोधात… pic.twitter.com/djMVEDRBdt
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर सवाल
प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला की, "या प्रकरणात जी माहिती आमच्याकडे आली, त्या माहितीच्या जोरावर माजी खासदारांच्या पीएने डॉक्टर तरुणीवर दबाव टाकला होता. त्या खासदाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिनचिट दिली आहे. यापूर्वी सोमनाथ सूर्यवंशीबद्दल खोटी माहिती सभागृहाला देण्यात आली होती, आणि आताही तसाच प्रकार घडत आहे."
खुलासा करण्याची मागणी
आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे की, "खासदारांच्या पीएने फोन केला होता की नाही? ते स्टेटमेंट (क्लिनचिट) करण्याआधी मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का? याचा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला पाहिजे."
SIT चौकशी आणि आंबेडकरांचे समर्थन
आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाशी आपण स्वतः फोनवर बोललो, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. पीडित कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मार्फत व्हावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण समर्थन असून "या प्रकरणी सत्य बाहेर आले पाहिजे. आरोपी कोणीही असो, त्याला अभय मिळता कामा नये," असे स्पष्ट मत आंबेडकरांनी व्यक्त केले. या कठीण प्रसंगी वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबियांच्या सोबत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
प्रकरणातील लेटेस्ट अपडेट्स:
सुसाईड नोटमधील नावे: मृत डॉक्टर तरुणीने आपल्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे नमूद केली आहेत. तिने शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
आरोपींवर कारवाई: या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे, तर आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
अन्य आरोप: मृत डॉक्टर मूळची बीडची असल्याने 'वरिष्ठांकडून तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले' असा आरोपही होत आहे.












Click it and Unblock the Notifications