राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फडणवीसांच्या पाठीशी
Mumbai: लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राज्य सरकारमधून मोकळे करण्याची पक्षनेतृत्त्वाला विनंती करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी नागपूर येथे चर्चा केली. संघाने त्यांना अभय दिल्याचे सांगण्यात येत आहे.
फडणवीस सरकारमधून बाहेर पडल्यास राज्यात वेगळा संदेश जाईल, अशी संघाची धारणा आहे. आगामी व्यूहरचनेसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

फडणवीस गुरुवारीच मुंबईतून नागपूरमार्गे दिल्लीत गेले. फडणवीस यांनी दिल्लीत राज्यातील भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारुण पराभव तसेच, राज्य सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेच्या जबाबदारी घेण्याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे समजते.
२०१९ नंतर उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडल्यानंतर राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर भाजपने अडीच वर्षापूर्वी सत्तांतर घडवले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केले. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार व त्यांच्या गटाला सोबत घेतले. यानंतर भाजपने महायुतीच्या माध्यमातून ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला होता.
परंतु, महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड देत काँग्रेस बंडखोरासह ३१ जागा जिंकल्या. तर, महायुती केवळ १७ जागा मिळाल्या. भाजपने २८ जागा लढवूनही २३ जागांवरून ९ जागांवर खाली आला. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुती विशेषतः भाजपसाठी धक्कादायक आहेत.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधील सर्व पदाचा राजीनामा देऊ केला आहे. तसेच पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अमित शाह, जे पी नड्डा यांची भेट
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी मुंबईतून नागपूरला गेले. तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी फडणवीस यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली. खासदार नितीन गडकरीही गुरुवारी नागपुरातच होते. राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी दुपारी बैठक असतानाही फडणवीस तातडीने नागपूरला गेल्याने याची चर्चा झाली.
सायंकाळी फडणवीस नागपूरवरून दिल्लीकडे रवाना झाले. रात्री उशिरा फडणवीसांनी पक्षाचे नेते अमित शहा, जे पी नड्डा यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे कळते.
मोदींचा रविवारी शपथविधी
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक शुक्रवारी संपन्न झाली. नरेंद्र मोदी हे रविवारी संध्याकाळी६ वाजता शपथ घेणार असल्याचे भाजपचे नेते प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीत स्पष्ट केले. याच बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव नेतेपदासाठी सूचित केले.












Click it and Unblock the Notifications