MCAमध्ये 'पॉवर प्ले': क्रिकेट न खेळलेलेच ठरवणार क्रिकेटचे भवितव्य? पवार कार्यकारिणीवर 'घराणेशाही'!
Rohit Pawar MCA news : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) आगामी निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील क्रिकेट राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मैदानावर कधीही बॅट न पकडलेल्या व्यक्तींच्या हाती आता महाराष्ट्राच्या क्रिकेटचे भवितव्य जाण्याची चिन्हे आहेत. विद्यमान अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीने मागील दोन वर्षांत तब्बल ४०० नवीन आजीव सदस्यांची नोंदणी केली असून, यात पवार कुटुंबातील सदस्यांसह राजकीय आणि व्यावसायिक हितसंबंध जपणाऱ्यांची मांदियाळी असल्याचे समोर आले आहे.

'पॉवर प्ले': १६३ वरून थेट ५७१ वर मजल
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सदस्यसंख्येत झालेली अवाढव्य वाढ हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. २०२३ मध्ये संघटनेची सदस्यसंख्या केवळ १६३ होती. मात्र, अवघ्या दोन वर्षांत ही संख्या ५७१ वर पोहोचली आहे. रोहित पवार यांचा कार्यकाळ संपत असल्याने, आगामी निवडणुकीत आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी ही 'मतदार नोंदणी' केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ६ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात हेच नवीन ४०० सदस्य निर्णायक भूमिका बजावणार आहेत.
घराणेशाहीचा आरोप : रेवती सुळे, कुंती पवारांची एन्ट्री
प्रारूप मतदार यादीनुसार, यात अनेक नावे ही थेट पवार कुटुंबातील आहेत. यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. दिलीप वेंगसरकर यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंना डावलून क्रिकेटशी काडीमात्र संबंध नसलेल्या कौटुंबिक सदस्यांना आणि व्यावसायिक भागीदारांना 'आजीव सदस्यत्व' का दिले गेले, असा सवाल आता विचारला जात आहे.
'वाडिया'ला डच्चू, राजकीय संस्थांना झुकते माप
संघटनात्मक रचनेतही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पुण्यातील प्रतिष्ठित वाडिया महाविद्यालयाला संस्था श्रेणीतून वगळण्यात आले आहे. त्याऐवजी खालील संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. रयत शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (बारामती) आणि महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल. संलग्न क्लबची संख्या १२ वरून वाढवून ३१ करण्यात आली असून, यात अनेक बड्या उद्योगसमूहांच्या संघांना स्थान देण्यात आले आहे.
क्रिकेट प्रेमींमध्ये संताप!
"ज्यांनी कधी मैदानात घाम गाळला नाही, ते आता क्रिकेटचे धोरण ठरवणार का?" असा संतप्त सवाल क्रिकेट प्रेमी विचारत आहेत. एमसीएने क्रिकेटच्या हितासाठी काम करणे अपेक्षित असताना, केवळ निवडणूक जिंकण्यासाठी सदस्यांची फौज उभी केल्याने महाराष्ट्राच्या क्रिकेट गुणवत्तेवर याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे
विद्यमान अध्यक्ष रोहित पवारांच्या पॅनेलने निवडणुकीची पूर्ण तयारी केली असून वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
- प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध: २५ डिसेंबर २०२५
- हरकती घेण्याची मुदत: २६ डिसेंबर २०२५ (दुपारी १ वाजेपर्यंत)
- मतदान आणि मतमोजणी: ६ जानेवारी २०२६












Click it and Unblock the Notifications