रोहित पवारांनी सोलापूर, बार्शी, करमाळ्यातील गणिते फिरवली; पहा नेमकं काय-काय केलं...
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या सर्वे वरिष्ठ नेत्यांसह युवानेतेही अँक्टीव्ह मोडवर दिसत आहेत. शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांना त्यांच्या स्वतःच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राम शिंदेंची टफ फाईट आहे. तरीही रोहित पवार सध्या महाराष्ट्रातील राजकारणात लक्ष घालतानाही दिसत आहेत. रोहित पवार यांनी नुकतीच सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद वाढवत तेथील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी नवीन व्यूव्हरचना केली. या प्रकाराची आज महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच चर्चा झाली.
करमाळ्यात संजय शिंदे यांना धक्का
करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना रोहित पवारांनी मोठा धक्का दिला. संजय शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या अनेक नेत्यांनी रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नारायण पाटील यांना पाठिंबा दिला. शरद पवार गटाने येथे नारायण पाटील यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्यासाठी रोहित पवार सध्या करमाळ्यात लक्ष घालताना दिसत आहेत. आ. संजय शिंदे यांचे अनेक कार्यकर्ते फोडून रोहित पवारांनी त्यांना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

बार्शीतही फिरवली गणिते
करमाळ्यासह रोहित पवारांनी बार्शी मतदारसंघातही लक्ष घातले. बार्शीत ठाकरे गटाने दिलीप सोपल यांना उमेदवारी दिली आहे. तेथे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांना आपल्यासोबत घेत रोहित पवारांनी त्यांचा शरद पवार गटात प्रवेश घडवून आणला. भूमकर महाविकास आघाडीत आल्याने तेथे दिलीप सोपल यांची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. वैराग येथून सोपलांनी लीड मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फडणवीसांवर साधला निशाणा
रोहित पवारांनी आपल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, प्रत्येक मतदारसंघात आपली खरी लढाई ही भाजपविरुद्ध आहे. फडणवीस हे नवीन युगाचे अभिमन्यू नाहीत, तर नव्या युगाचे ते जनरल डायर आहेत. अंतरवाली सराटी येथे त्यांच्याच सांगण्यावरून लाठीचार्ज झाला. भाजपने धनगरांना आरक्षण दिले नाही. मराठा, ओबीसी असे अनेक आंदोलन भाजपने मतांसाठी सुरू ठेवली. गुजरातच्या पद्धतीने ही सगळी आंदोलने पायाखाली तुडवायची अशी भाजपची निती आहे, असा हल्लाबोलही पवारांनी केला.












Click it and Unblock the Notifications