गुलाबराव पाटलांच्या 'फोडाफोडी'वर रोहित पवारांचं 'प्लॅस्टर'; घेतलं थेट ईडी-सीबीआयचं नाव...
गुलाबराव पाटलांनी शनिवारी एक धक्कादायक विधान केलं होतं. पुरेशा पटसंख्येअभावी जळगाव जिल्ह्यातील झेडपीच्या शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत शिक्षकांनी नुसते हातावर हात धरुन न बसता, आम्ही राजकारणी जसे पक्ष फोडतो तसेच शिक्षकांनीही दुसऱ्या इंग्रजी शाळेतील विद्यार्थी फोडले पाहिजेत, असा अजब सल्ला एका कार्यक्रमात दिला होता. गुलाबराव पाटलांच्या याच वक्तव्याचा समाचार आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी घेतला. विद्यार्थ्यांना फोडण्यासाठी त्यांच्या मागे ईडी, सीबीआय, आयटी चौकशीचा ससेमिरा लावणार का? असा सवाल रोहित पवारांनी केला.

काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवारांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात म्हटले आहे की, आता विद्यार्थी फुटले नाही, तर मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्यामागे ईडी, सीबीआय किंवा आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, अशी भिती वाटतेय. मंत्री गुलाबराव पाटलांनी विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकार शाळांमधील सुविधा व शिक्षकांच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता सुधारावी. असं केलं तर शाळेपुढे विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील.
आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री महोदय #ED #CBI #IT च्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय..
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 13, 2025
मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा. शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या… pic.twitter.com/s5CP09AL76
काय म्हणाले होते मंत्री पाटील?
शनिवारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगावात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे बक्षिस वितरण झाले. त्यात कार्यक्रमात शिक्षकांना मार्गदर्शन करताना मंत्री पाटील यांनी शिक्षकांना एक सल्ला दिला. मंत्री पाटील म्हणाले होते की, ग्रामीण भागांतील शाळेत ४५ हजार विद्यार्थी आहेत. त्यात गेल्या काही वर्षांत वाढ झालेली नाही. अनेक शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी शिक्षकांनी हातावर हात धरुन न बसता, इंग्रजी शाळेतील विद्यार्थी पळवून आणावेत, अस मंत्री पाटील म्हणाले होते.












Click it and Unblock the Notifications