बीडमधील बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले निघाला मोबाईल चोर; सुरत पोलिसांकडून अटक, Video Viral
Ex-Cop Ranjit Kasle Arrested in Latur Mobile Theft by Gujarat Police : 'झुकेगा नही साला' असे म्हणत स्वतःला 'बॉस' म्हणून मिरवणारा बीड जिल्ह्यातील वादग्रस्त आणि बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले पुन्हा एकदा गंभीर गुन्ह्यात अडकला आहे. या वेळी त्याने थेट 'मोबाईल चोर' आणि 'जबरी लुटारू' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
गुजरात पोलिसांनी त्याला लातूरातून अटक केली असून, तपासणीच्या नावाखाली नागरिकांना लुटतानाचा सीसीटीव्ही आणि त्यानंतर गुन्हा कबूल करत माफी मागतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे, ज्यामुळे कासलेची सर्व 'बॉस'गिरी संपुष्टात आली आहे.

तपासाच्या नावाखाली मोठी लूट
मिळालेल्या माहितीनुसार, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले काही दिवसांपूर्वी गुजरात राज्यातील सुरत येथे गेला होता. सुरत येथे त्याने 'गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक' असल्याचा बनाव केला. या बनावाच्या आधारे त्याने दोघांना धाकदपटशहा करत त्यांची जबरी लूट केली. या लुटीमध्ये त्याने दोन मोबाईल फोन आणि दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम हिसकावून घेतली.
या घटनेची तक्रार सुरत पोलिसांकडे दाखल होताच, त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांना या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाला, ज्यात रणजीत कासले दोन व्यक्तींना धमकावून त्यांचे मोबाईल हिसकावून घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे.
झुकेगा नही साला म्हणणारा बॉसच निघाला मोबाईल चोर.. सुरत पोलिसांनी केला रणजीत कासले चा व्हिडिओ व्हायरल...
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) October 22, 2025
वादग्रस्त आणि बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले निघाला मोबाईल चोर... सुरत पोलिसांनी व्हायरल केला व्हिडिओ #ranjitkasle #Laturpolice #Crimenews #CCTV #video pic.twitter.com/0QEWNdTtEQ
'पुष्पा' स्टाईल ॲक्शन आणि अटकेची नाट्यमयता
तक्रार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरत पोलिसांनी रणजीत कासलेचा शोध सुरू केला. २० ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात पोलिसांच्या एका विशेष पथकाने लातूर शहरात धडक कारवाई करत त्याला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, अटक करतानाही रणजीत कासलेने आपली वादग्रस्त प्रवृत्ती सोडली नाही. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने 'बॉसला अटक झाली' असे म्हणत, प्रसिद्ध 'पुष्पा' चित्रपटातील 'झुकेगा नहीं साला' स्टाईलमध्ये ॲक्शन करून गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे कृत्य अटकेच्या नाट्यमयतेत भर घालणारे ठरले.
माफी मागतानाचा व्हिडीओ व्हायरल
परंतु, गुजरात पोलिसांच्या चौकशीत रणजीत कासलेची 'बॉस'गिरी फार काळ टिकली नाही. सुरत पोलिसांनी नंतर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल केला, ज्यामध्ये तो आपला गुन्हा कबूल करत हात जोडून माफी मागताना दिसत आहे. 'झुकेगा नही साला' म्हणणारा हा बडतर्फ अधिकारी कायद्यासमोर मात्र नम्रपणे 'माफी' मागताना दिसल्यामुळे त्याच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश झाला आहे.
जबरी घरफोडीतील आरोपींना मदत केल्याचा संशय
रणजीत कासले याच्या अटकेमागे आणखी एक गंभीर कारण आहे. गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेल्या जबरी घरफोडीच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना रणजीत कासले याच्याबद्दल माहिती मिळाली होती.
या आरोपींना रणजीत कासले याने मदत केली असावी किंवा त्यांना इतर सहकार्य पुरवले असावे, असा गंभीर संशय गुजरात पोलिसांना होता. याच संशयाच्या आधारावर गुजरात पोलिसांनी दोन दिवस लातूर शहरात गुप्त मोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले आणि सुरतला घेऊन गेले.
महाराष्ट्रात सात गुन्हे दाखल!
बीड जिल्ह्यातून बडतर्फ झाल्यानंतरही सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या रणजीत कासलेवर आतापर्यंत महाराष्ट्रात सात गुन्हे दाखल आहेत. 'पोलीस' या जबाबदार पदावरून बडतर्फ होऊनही त्याने आपला जुना वादग्रस्त मार्ग सोडला नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. एका बडतर्फ अधिकाऱ्याने तपासाच्या नावाखाली लोकांची लूट करणे हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक कृत्य आहे.












Click it and Unblock the Notifications