मविआचं टेन्शन वाढलं..? विधानसभा अध्यक्षपदासाठी 'या' नेत्याचं नाव चर्चेत
Election of Speaker of Legislative Assembly- राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीने तब्बल 231 जागा जिंकल्या. त्याउलट महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून अर्धशतकही करता आलं नाही. पाच डिसेंबरला अपेक्षेप्रमाणे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची, तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे व अजित पवार गटाकडून स्वतः अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आजपासून विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरु झालं मात्र पहिल्याच दिवशी मविआचं टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली.

मविआचं टेन्शन वाढणार?
आजपासून विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरु झालं. मंत्रीमंडळाची पहिली बैठक पार पडली. या अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीसह विधानसभा अध्यक्षांची निवडही चर्चेत आली. विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्या दुपारपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पदासाठी भाजपनेच आग्रह धरला असून तेच या जागेसाठी उमेदवार देणार आहेत. त्यांच्याकडून पुन्हा विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर हे उमेदवार असतील, असे सांगितले जात आहे.
नार्वेकरांना मंत्रीपदाची अपेक्षा
विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचे नाव भाजपकडून जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने विधानसभा अध्यक्षपदही भाजपलाच मिळणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राहुल नार्वेकर हे मंत्रिपदासाठी इच्छूक होते, महायुतीमध्ये यावेळी आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. त्यामुळे आता ते उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मविआचा वाढली चिंता
यापूर्वी राज्यात दोन प्रमुख पक्षात फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची लढाई झाली. या दोन्ही लढाईत राहुल नार्वेकरांनीच निर्णय दिला. आमदार अपात्रतेचं प्रकरण प्रथम सुप्रीम कोर्टात पोहोचलं. त्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. दरम्यान आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हेच विधानसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता असल्याने या दोन्ही पक्षांची चिंता वाढली आहे.












Click it and Unblock the Notifications