Radhakrishna vikhe patil Biography:राधाकृष्ण विखे बनले पुन्हा मंत्री, वाचा विखे घराण्याचा इतिहास
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्रात ज्या मोजक्याच घराण्यांची तिसरी व चौथी पिढी राजकारणात आहे, त्यात एक आहे अहिल्यानगर जिल्ह्यातले विखे घराणे. विखे-पाटील घराण्यातील तिसरी पिढीही आता राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकीक आहे. शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे हे यंदा आठव्यांदा आमदार झाले.

कशी झाली राजकारणाला सुरुवात
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जन्म 15 जून 1959 मध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू मिळालं. आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले पब्लिक स्कूल प्रवरानगरला सुरू केले. याच पब्लिक स्कूलमध्ये राधाकृष्ण विखे यांना पहिलीत प्रवेश देण्यात आला. आजोबांच्या आग्रहाखातरच त्यांचे शिक्षण वसतिगृहातच झाले. तिथूनच राधाकृष्ण विखे त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण झाली. अकरावीनंतर धुळे, कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना ते सामाजिक कार्याकडे ओढले गेले.
काँग्रेसमधून सुरु झाला प्रवास
राधाकृष्ण विखेपाटील हे 1986 मध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. या काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी काढली. काँग्रेसमधूनच त्यांच्या राजकारणास सुरुवात झाली. त्यांनी 1994 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. तेव्हापासून तेच या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
अनेकदा पक्षही बदलला
राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. वडिलांपाठोपाठ राधाकृष्ण विखे यांनीही आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही शिवसेनेत प्रवेश करावा लागला होता. या इतिहासाची पुनरावृत्ती 2019 मध्ये पाह्यला मिळाली. 2019 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.
भुषविली अनेक मंत्रीपदे
अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कृषीमंत्री झाले. 2009 पासून ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजीनामा देण्याआधी ते काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते होते. अहमदनगरमधील प्रवरा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते प्रमुख आहेत. गेल्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी होती. यावेळीही ते मंत्रीपदाची शपथ घेत आहेत.












Click it and Unblock the Notifications