Swargate Rape case : आरोपी गाडेच्या वकिलांचा दावा, म्हणाले- दोघांमध्ये ओळख होती, संबंधही सहमतीने
Pune Swargate Rape case Update : पुण्यातील स्वारगेट बस डेपो मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 दिवसांची पोलिस कोठडी मिळालेली आहे. सेशन कोर्टाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिला. त्यामुळे आरोपीची पुढील काळात चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, काल झालेल्या सुनावणीनंतर आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की दत्ता गाडे आणि सदर तरुणी यांच्यात एका महिन्यापासून ओळख झालेली होती. तसेच त्यांच्यात झालेला संबंध हा सहमतीने झालेला आहे, त्यामुळे याला बलात्काराशी का जोडले जात आहे. आम्ही आमचा लढा चालूच ठेऊ असाही दावा त्यांनी केला.
काय म्हणाले आरोपी गाडेचे वकील?
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. या प्रकरणात दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते दोघे एकाच बसमधून खाली उतरले, ते बस मधून कोठे गेले? याची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दोघांमध्ये पैसाचा वाद असल्याचा दावा
या दोघांमध्ये पैशांचा वाद झाला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे पळून गेला नाही तर तो त्याच्या गावी गेला होता. मात्र गावाला पोलिस छावणीचे रूप आल्याने तो लपून बसला, अशी माहिती देखील दत्तात्रय गाडे च्या वकिलांनी न्यायलयात दिली आहे.
12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
पुण्यात पार्क केलेल्या बसमध्ये 26 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडेला गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. यानंतर, त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपीला कुठून व कसे अटक केली?
गुन्हे शाखेचे डीसीपी निखिल पिंगळे म्हणाले - शिरूर तहसील मधील गुणाट गावातून आरोपीला अटक करण्यात आली. तो उसाच्या शेतात लपला होता. यावेळी गावकऱ्यांनी आम्हाला मदत केली. आरोपी गावात असल्याचे गावकऱ्यांनीच सांगितले होते. रात्री त्याने एका घरातून पिण्याचे पाणी आणि अन्न मागितले. यावेळी लोकांनी त्याला ओळखले आणि पोलिसांना माहिती दिली.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपीला रात्री 1:10 वाजता गुणाट गावातून अटक करण्यात आली. या प्ररकणी एका विशेष वकिलाची नियुक्ती केली जाईल. आम्ही केस लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असाही दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
तो भाजीपाल्याच्या गाडीत बसून गावी गेला
बलात्कार केल्यानंतर, आरोपी पुण्याहून भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये लपून त्याच्या गावी पळून गेला. घरी पोहोचल्यावर त्याने कपडे आणि बूट बदलले. यानंतर तो घरातूनही निघून गेला. पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती की आरोपी गावातीलच उसाच्या शेतात लपून बसला असावा. पोलिस ड्रोन आणि स्निफर डॉगच्या मदतीने त्याचा शोध घेत होते. आरोपीला पकडण्यासाठी 13 पोलिस पथके तयार करण्यात आली होती.












Click it and Unblock the Notifications