"गब्बर को सिर्फ" एका बॅनरमुळे पुण्यात राजकीय 'शोले'; मोहोळ यांच्या बॅनरवर टीकेची झोड
पुणे महापालिकेत भाजपने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर शहरात सगळीकडे जल्लोषाचे वातावरण आहे. या विजयाचे मुख्य शिल्पकार म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे नाव घेतले जात आहे. मात्र, याच उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी लावलेल्या एका बॅनरने आता नवा वाद ओढवून घेतला आहे.

काय आहे तो 'शोले' स्टाईल बॅनर?
सारस बागेच्या परिसरात मोहोळ यांच्या समर्थकांनी एक भव्य फ्लेक्स लावला आहे. यावर चित्रपटातील संवादाची फोडणी देत असे लिहिले आहे की, "गब्बर को सिर्फ एक ही आदमी हरा सकता है, खुद गब्बर!" एकीकडे मोहोळ यांच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक म्हणून कार्यकर्त्यांनी हे वाक्य वापरले असले, तरी दुसरीकडे 'गब्बर' या शब्दावरून विरोधकांनी भाजपला धारेवर धरले आहे. 'शोले' चित्रपटातील गब्बर सिंग हा क्रूर डाकू म्हणून ओळखला जातो, त्यामुळे आपल्याच नेत्याची तुलना एका डाकूशी करणे कार्यकर्त्यांना महागात पडताना दिसत आहे.
सुषमा अंधारेंचा 'निशाणा'
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा मुद्दा उचलून धरत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या बॅनरचा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर शेअर करत त्यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच फिरकी घेतली. अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की "गब्बर लोकांची घरदार लुटणारा, खून-दरोडे टाकणारा आणि बेकायदेशीर पद्धतीने लोकांच्या जागा बळकावणारा कुप्रसिद्ध डाकू होता...!!"
अंधारे यांच्या या टीकेमुळे "आपल्याच नेत्याचे कौतुक करताना कार्यकर्त्यांनी सेल्फ गोल तर केला नाही ना?" असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
गब्बर लोकांची घरदार लुटणारा खून दरोडे टाकणारा बेकायदेशीर पद्धतीने लोकांच्या जागा बळकावणारा कुप्रसिद्ध डाकू होता...!!! pic.twitter.com/6CRmVQV9O8
— SushmaTai Andhare (@andharesushama) January 21, 2026
'गब्बर' की 'डॉन'? श्रेयवादाच्या लढाईत भाषेचा खेळ
पुण्यात याआधीही अनेक नेत्यांना 'किंगमेकर' किंवा 'डॉन' अशा पदव्या लावल्या गेल्या आहेत. मात्र, थेट 'गब्बर'शी तुलना झाल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा होत असतानाच, आता या बॅनरबाजीवरून सुरू झालेला 'सामना' सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भाजपचे कार्यकर्ते या टीकेला काय उत्तर देतात आणि हा 'गब्बर' नावाचा पडदा कधी खाली येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications