बंडू आंदेकरला अजितदादांकडून तिकीट? अर्ज दाखल केल्यानंतर नेमक्या काय चर्चा?
पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Election) पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण एका मोठ्या वळणावर येऊन ठेपले आहे. शहरातील कुख्यात 'आंदेकर टोळी'चा म्होरक्या बंडू आंदेकर (Bandu Andekar) याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, सध्या तुरुंगात असलेल्या बंडू आंदेकरने थेट न्यायालयाकडून परवानगी मिळवून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

कोर्टाचा मोठा निर्णय: 'निवडणूक लढवणे हा मूलभूत अधिकार'
काही दिवसांपूर्वीच बंडू आंदेकरने निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. "निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे," असे नमूद करत कोर्टाने आंदेकरला अर्ज भरण्याची मुभा दिली. मात्र, ही परवानगी देताना पोलिसांनी कडक अटी घातल्या होत्या.
आंदेकर कुटुंबातील 'पॉवर गेम'; एकाच वेळी तीन अर्ज
यावेळच्या निवडणुकीत केवळ बंडू आंदेकरच नाही, तर त्याच्या कुटुंबातील इतर दोन सदस्यांनीही शड्डू ठोकला आहे. यामध्ये खालील नावांचा समावेश आहे:
- बंडू आंदेकर (स्वतः टोळीचा म्होरक्या)
- लक्ष्मी उदयकांत आंदेकर
- सोनाली वनराज आंदेकर (वनराज आंदेकर यांच्या पत्नी)
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
पोलिसांचा कडक पहारा आणि 'नो शक्तीप्रदर्शन'
तुरुंगातून अर्ज भरण्यासाठी येताना बंडू आंदेकरला कडक पोलीस बंदोबस्तात आणले गेले. न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार, अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन, घोषणाबाजी किंवा गर्दी जमवता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र यावेळी बंडू आंदेकरने नेकी का काम, आंदेकर का नाम अशा घोषणा दिल्या.
अजित पवार गटाची 'सायलेंट' रणनीती?
आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अजित पवार गटाने या उमेदवारीबाबत अत्यंत गुप्तता पाळली होती. अधिकृत घोषणा न करता थेट अर्ज भरण्यावर भर देण्यात आला, जेणेकरून विरोधाची धार कमी करता येईल. मात्र, सत्ताधारी पक्षाने अशा प्रकारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पाठबळ दिल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात आता वादाचे मोहोळ उठण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications