हायप्रोफाईल लढतीत कुणाचे पारडे जड? प्रभाग क्रं ३ आणि ४ मध्ये विरोधकांच्या गोटात अस्वस्थता
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Election) रणधुमाळीत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३ आणि ४ केंद्रबिंदू ठरले आहेत. भारतीय जनता पक्षाने या दोन प्रभागांतून सुरेंद्र पठारे (Surendra Pathare) आणि ऐश्वर्या पठारे (Aishwarya Pathare) या तरुण चेहऱ्यांना मैदानात उतरवल्याने येथील लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. मात्र, सध्याच्या स्थितीला या दोन्ही प्रभागांमध्ये काय चित्र आहे ते आम्ही ग्राऊंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरेंद्र पठारेंची चर्चा का?
प्रभाग क्रमांक ४ मध्ये सुरेंद्र पठारे यांच्या उमेदवारीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सीओईपी (COEP) सारख्या संस्थेचे 'गोल्ड मेडल' आणि इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असलेला उमेदवार समोर आल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल कुतूहल आहे.
स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, सुरेंद्र पठारे यांनी गेल्या काही वर्षांत 'सुरेंद्र पठारे फाउंडेशन'च्या माध्यमातून जो जनसंपर्क निर्माण केला, त्याचा फायदा त्यांना मिळताना दिसत आहे. "एकीकडे प्रस्थापित राजकीय घराण्याचा वारसा आणि दुसरीकडे स्वतःची कामाची स्वतंत्र पद्धत, यामुळे सुरेंद्र यांच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार विरोधकांना मिळाला नाही, असे मत येथील काही नागरिकांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या विरोधात कोणताही 'हेवीवेट' उमेदवार समोर न आल्याने सध्या तरी त्यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्थिती काय?
प्रभाग क्रमांक ३ मध्ये ऐश्वर्या पठारे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येतेय. केवळ राजकीय कुटुंबातील सून ही ओळख मर्यादीत न ठेवता, त्यांनी कामाच्या आणि उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे.
उद्योजिका म्हणून त्यांची असलेली प्रतिमा आणि सर्व घटकांमध्ये असलेला वावर यामुळे त्यांच्या प्रचाराला गती मिळाली आहे. या प्रभागातही त्यांच्या तोडीचा किंवा तितकाच व्यापक जनसंपर्क असलेला महिला चेहरा देण्यात विरोधकांना अपयश आल्याने विरोधकांच्या गोटात काहीशी चिंतेची स्थिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विरोधकांची कोंडी की रणनीती?
दोन्ही प्रभागांचा आढावा घेतल्यास असे दिसते की, भाजपमध्ये नुकत्याच झालेल्या प्रवेशानंतर सुरेंद्र पठारे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ लाभले आहे. "सुरेंद्र पठारे यांच्या सर्वसमावेशक धोरणामुळे आणि तरुण वर्गातील लोकप्रियतेमुळे विरोधकांसाठी निवडणुकीचे मैदान कठीण झाले आहे," असे निरीक्षण काही जाणकार नोंदवत आहेत.
सध्यातरी, भाजपच्या या 'पॉवर कपल'ने आपल्या प्रभागांत भक्कम तटबंदी उभारली आहे. आता विरोधक या आव्हानाला उत्तर देण्यासाठी कोणता 'पत्ता' बाहेर काढतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications