Pune : देवदर्शनास निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; पिकअप दरीत कोसळले, आरडाओरड अन् 8 महिला ठार!
Pune Accident News : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात श्रावणी सोमवारच्या दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून, एका भीषण अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. पिकअप वाहनातून जात असलेल्या भाविकांचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याने महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमके काय घडले?
आज दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास खेड तालुक्यातील पाईट येथील कुंडेश्वर डोंगरावर हा अपघात झाला. खेड जवळील गावातील २५ ते ३० प्रवासी, ज्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश होता.
ते सर्वजण तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त कुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. मंदिराकडे जाणाऱ्या नागमोडी वळणावरून एक पिकअप गाडी वर येत असताना अचानकपणे ती रिव्हर्स आली आणि ५ ते ६ वेळा पलटी घेऊन थेट दरीत कोसळली.
या भीषण दुर्घटनेत ८ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मदतकार्याला विलंब झाल्याचा आरोप
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, प्रशासनाकडून लवकर रुग्णवाहिका आणि मदत न मिळाल्याने काही भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या गंभीर आरोपांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आ. बाबाजी काळे काय म्हणाले?
घटनेची माहिती मिळताच खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी तातडीने जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना भेट दिली. त्यांनी घटनेची व परिस्थितीची माहिती घेत जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, "जशा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या, खासगी वाहनं मिळाली, तसे जखमींना जवळच्या खासगी व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे." तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने अद्याप मृतांची नावे जाहीर करण्यात आलेली नव्हती. तर मृतांच्या पुष्टीविषयी आमदार काळे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.












Click it and Unblock the Notifications