पुण्यात 'FDA'चा सर्जिकल स्ट्राईक; 31 कोटींचा 'निकोटीन' साठा जप्त; अवैध हुक्का माफियांचे धाबे दणाणले!
Pune FDA raid latest news : महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित वस्तूंच्या विरोधात पुकारलेल्या युद्धाला आता मोठे यश मिळताना दिसत आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात एक मोठी कारवाई केली.
तब्बल ३१ कोटी ६७ लाख रुपयांचा बेकायदेशीर हुक्का आणि निकोटीनयुक्त साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे राज्यातील अवैध हुक्का पार्लर आणि अमली पदार्थांच्या तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मावळमधील कंपनीवर छापा: ३१.६७ कोटींचा मुद्देमाल जप्त
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या कडक आदेशानंतर प्रशासनाने आपली मोहीम तीव्र केली आहे. याच अंतर्गत, २ जानेवारी २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ येथील टाकवे येथील 'मे. सोएक्स इंडिया प्रा. ली.' या कंपनीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत प्रशासनाने ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा विविध फ्लेवर्सचा हुक्का, कच्चा माल आणि निकोटीनचा साठा जप्त केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीच्या उत्पादनांचे नमुने १ डिसेंबर २०२५ रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालात या नमुन्यांमध्ये 'निकोटीन'चे प्रमाण पॉझिटिव्ह आढळले, जे मानवी आरोग्यास अत्यंत घातक आहे.
अवैध साखळीवर 'प्रहार': भिवंडी ते पुणे कनेक्शन
प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि हुक्का माफियांच्या विरोधात सुरू असलेली ही मोहीम केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही. भिवंडीतील दापोडे येथील 'मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी' या गोदामावर ३० डिसेंबर रोजी टाकलेल्या छाप्यात १९ कोटी ४५ लाख रुपयांचा 'अफजल' ब्रँडचा हुक्का साठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईचा धागा पकडून प्रशासनाने पुण्यातील या मोठ्या साखळीचा पर्दाफाश केला आहे.
गुन्हा दाखल आणि कंपनीला सील
या प्रकरणी प्रशासनाने कठोर कायदेशीर पावले उचलली असून कंपनीला सील ठोकले आहे. खालील व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे:
- अनिल कुमार चौहान (असिस्टंट मॅनेजर)
- असिफ फाजलानी (संचालक)
- फैजल फाजलानी (संचालक)
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५), १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
जळगावमध्ये ७५ लाखांचा गुटखा जप्त
एकीकडे पुणे आणि भिवंडीत कारवाया सुरू असताना, दुसरीकडे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरही प्रशासनाने सतर्कता दाखवली आहे. जळगाव जामोद येथील तपासणी नाक्यावर वनविभागाने मध्यप्रदेशातून अवैधरित्या आणला जाणारा ७५ लाख रुपये किमतीचा 'विमल' गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला.
प्रशासनाचा इशारा
महाराष्ट्र सरकारने १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार, मानवी आरोग्यास घातक ठरणारा सुगंधी तंबाखू, गुटखा आणि निकोटीनयुक्त हुक्का यावर पूर्णपणे बंदी आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे की, राज्याच्या कानाकोपऱ्यात अशा कारवाया सुरूच राहतील आणि तरुणाईला व्यसनाधिनतेकडे ढकलणाऱ्या माफियांची गय केली जाणार नाही.












Click it and Unblock the Notifications