Pune Crime : चारित्र्याच्या संशयाचे भूत डोक्यात शिरले; पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करून संपवले
Pune Crime News : नात्यातील अविश्वास आणि संशयाचे जाळे किती भयावह असू शकते, याचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात आला आहे. आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असल्याच्या रागातून पतीने पत्नीची चाकूने सपासप वार करून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून लोणीकंद पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?
मृत तरुणीचे नाव नम्रता शैलेंद्र व्हटकर (१९) असून, आरोपी पती शैलेंद्र प्रकाश व्हटकर (३०) याला पोलिसांनी अटक केली आहे. नम्रता आणि शैलेंद्र यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, संशयामुळे सुखी संसार अवघ्या सहा महिन्यांतच विस्कळीत झाला. नम्रता एका खाजगी कंपनीत नोकरी करत असताना तिची ओळख शाहरुख पठाणशी झाली आणि त्यांचे सूत जुळले. या कारणावरून पती-पत्नीत सतत खटके उडू लागले.
लिव्ह-इन रिलेशनशिप आणि वाद
पतीच्या त्रासाला कंटाळून नम्रता मागील दोन महिन्यांपासून पतीचे घर सोडून शाहरुख पठाणसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दरम्यान, तिचे सोन्याचे दागिने पती शैलेंद्रकडेच राहिले होते. हेच दागिने परत देण्याच्या बहाण्याने शैलेंद्रने हत्येचा कट रचला.
दागिन्यांचा बहाणा अन् रक्ताचा सडा
२२ जानेवारीच्या रात्री शैलेंद्रने नम्रताला दागिने नेण्यासाठी वाडेबोल्हाई फाटा येथे बोलावले. नम्रता तिचा मित्र शाहरुख आणि हरीशसोबत तिथे पोहोचली. शैलेंद्रने तिला एका अंधाऱ्या ठिकाणी (जोगेश्वरी शाळेच्या मागे) एकटीला भेटायला बोलावले. नम्रता तिथे पोहोचताच, दबा धरून बसलेल्या शैलेंद्रने तिच्यावर चाकूने हल्ला चढवला.
घटनेचा थरार
नम्रताच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शाहरुख तिच्या दिशेने धावला, तेव्हा त्याला शैलेंद्र नम्रताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार करताना दिसला. शाहरुखला पाहताच आरोपी आपली दुचाकी आणि हत्यार सोडून पसार झाला. गंभीर जखमी नम्रताला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
पोलिसांची तत्परता
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी शैलेंद्र व्हटकरला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शाहरुख पठाणने फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications