प्रताप सरनाईकांनी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी केली; नातवासाठी मोठं गिफ्ट
भारतामध्ये 15 जुलै रोजी टेस्ला कार अधिकृतपणे दाखल झाली. मुंबईतील बीकेसी (BKC) येथे टेस्लाचे भव्य शोरूम सुरू झाल्यानंतर आज, 5 सप्टेंबरपासून या गाड्या ग्राहकांना वितरित करण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या वितरणाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला होता आणि आज त्यांनी तो प्रत्यक्षात आणून दाखवला. या खरेदीनंतर बोलताना त्यांनी सांगितले की, "भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली, याचा मला अभिमान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कार मी कोणत्याही सवलतीशिवाय, पूर्ण पैसे भरून घेतली आहे."
सरनाईक यांनी ही कार आपल्या मुलासाठी नव्हे, तर आपल्या नातवासाठी घेतल्याचे सांगितले. "माझा नातू ही कार शाळेत घेऊन जाईल आणि या माध्यमातून तो सर्वांना पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि इलेक्ट्रिक वाहनांचा संदेश देईल," असे ते म्हणाले. टेस्ला ही जगातील सर्वात सुरक्षित आणि अत्याधुनिक कार म्हणून ओळखली जाते.
टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्ये (Tesla Y Model Car)
टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्ये आहेत.
- Tesla 3 RWD हे मॉडेल केवळ 5.6 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास इतका वेग गाठू शकते.
- Tesla 3 LR RWD ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 622 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.
- स्टँडर्ड RWD व्हर्जन एकदा चार्ज केल्यावर 500 किलोमीटरपर्यंत धावते.
- नवीन Model Y मध्ये बाहेरील आणि आतील रचनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यात आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शन दिले आहे.
- Model Y ही टेस्लाची जगभरातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे.
- भारतात Model Y ची थेट स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7 आणि Mercedes-Benz EQA सारख्या प्रीमियम गाड्यांशी आहे. ही कार भारतात पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे तिच्या किमतीत वाढ झाली आहे.
टेस्ला कार आणि तिची किंमत (Tesla Y Model LR RWD Car)
टेस्लाच्या Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख आहे, तर LR RWD व्हर्जनची किंमत ₹69.15 लाख इतकी आहे. या किमतींमध्ये आपल्या आवडीचा रंग निवडण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
- स्टेल्थ ग्रे या रंगासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.
- पर्ल व्हाइट मल्टी-कोट (₹95,000 अतिरिक्त)
- डायमंड ब्लॅक (₹95,000 अतिरिक्त)
- ग्लेशियर ब्लू (₹1,25,000 अतिरिक्त)
- क्विक सिल्व्हर (₹1,85,000 अतिरिक्त)
- अल्ट्रा रेड (₹1,85,000 अतिरिक्त)
या खरेदीमुळे महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळेल आणि इतर अनेक उद्योजकांनाही या दिशेने विचार करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications