फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण;'चारित्र्यहनन'वरून राजकीय घमासान; चाकणकर पदावर कशा?, या नेत्याचा सवाल
Prakash Mahajan Slams Rupali Chakankar Ajit Pawar : फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. महाजन यांनी चाकणकर यांच्यावर मृत महिलेचे चारित्र्यहनन केल्याचा आरोप करत, त्यांना पदावरून का हटवले जात नाही, असा सवाल विचारला आहे.
चाकणकर यांच्यावर 'चारित्र्यहनना'चा गंभीर आरोप
महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांनी मृत डॉक्टर महिलेच्या चॅटिंगचे तपशील सार्वजनिक केल्याने, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. "मृत डॉक्टर महिलेचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा आहेत? अजित पवार कोणत्या 'रूपात' अडकलेत?" हा थेट प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे.
मृत डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने, महाजन यांनी या प्रकरणाशी आपले भावनात्मक नाते असल्याचे सांगत, या प्रकरणातील भावनिक बाजू अधोरेखित केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. रणजितसिंह निंबाळकर यांना क्लीनचिट देण्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अशा प्रकारची माणसं तुमच्या भोवती गोळा होत असतील, तर पक्ष बदनाम होणारच," असा इशारा महाजन यांनी दिला.

जयकुमार गोरेंवर 'बाहेरून रोग आणल्या'ची बोचरी टीका!
भाजप आमदार जयकुमार गोरे यांनीही या प्रकरणात मृत महिलेच्या चॅटिंगवर भाष्य करत तिच्या खाजगी आयुष्यावर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप आहे. "जयकुमार गोरे यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल, तर त्यांच्या तोंडून हे वक्तव्य येणार, अशी अत्यंत बोचरी टीका महाजन यांनी केली. जयकुमार गोरे हे मूळचे भाजपचे नसून बाहेरून आले आहेत. "त्यांनी बाहेरून येताना हा रोग आणला आहे," असे महाजन म्हणाले.
ईडी चौकशीची मागणी
गोरे यांच्याकडे एका महिलेला एक कोटी रुपये देताना ट्रॅप करण्यात आले होते; ते एक कोटी रुपये गोरेंकडे कसे आले, याची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.
पाशा पटेल 'उपटसुंभ'; पंकजा मुंडेंच वारसदार!
या प्रकरणाच्या राजकीय पडसादात, प्रकाश महाजन यांनी पाशा पटेल यांनाही सोडले नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार कोण या विषयावर पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्यांवरून महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. महाजन यांनी पाशा पटेल यांना 'उपटसुंभ' संबोधत, त्यांच्यासारखा मतलबी आणि संधीसाधू माणूस सापडणार नाही, असे स्पष्ट केले. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यावर धनंजय मुंडे यांनी अंत्यसंस्कार करावेत, असे म्हणणारे पाशा पटेल होते, याची आठवण महाजन यांनी करून दिली.
पंकजा मुंडेंना समर्थन
गोपीनाथ मुंडे यांचा वारसा ठरवण्याचा हक्क त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना आणि ओबीसी वर्गाला आहे. "गोपीनाथ मुंडे यांचा वारसा फक्त पंकजा मुंडेच आहेत, दुसरं कोणी नाही," असे ठाम मत त्यांनी मांडले.












Click it and Unblock the Notifications