Amol Balwadkar Win :अमोल बालवडकरांचा ऐतिहासिक विजय;भाजपला मोठा धक्का ! किती मतांची लीड?
Amol Balwadkar Vs Lahu Balwadkar : पुणे महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बाणेर-बालेवाडी प्रभाग क्रमांक ९ मधून अमोल बालवडकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील नव्हती, तर ती 'बंडखोर विरुद्ध प्रस्थापित' अशी होती. अमोल बालवडकर यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर यांचा पराभव करत पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. ८०० मतांनी अमोल बालवडकर यांनी बाजी मारली आहे.

राज्याचे लक्ष लागलेली लढत
बाणेर-बालेवाडीच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपने अमोल बालवडकरांचे तिकीट कापून लहू बालवडकर यांना मैदानात उतरवले होते. यामुळे ही लढत अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या चुरशीची झाली होती. भाजपने आपली सर्व ताकद लहू बालवडकर यांच्या पाठीशी लावली असतानाही, मतदारांनी मात्र अमोल बालवडकर यांना पसंती दिली आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड
अमोल बालवडकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) चिन्हावर ही निवडणूक लढवली. लहू बालवडकर हे भाजपचे नेते असल्याने, भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची होती. खुद्द चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ आणि भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी लहू बालवडकर यांच्या विजयासाठी ताकद लावली होती. मात्र, अमोल बालवडकर यांच्या दांडग्या जनसंपर्कासमोर भाजपची सर्व गणिते चुकली आहेत.
विजयाचे महत्त्वाचे मुद्दे
- कामाची पोचपावती: अमोल बालवडकर यांनी गेल्या पाच वर्षांत फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेले काम आणि कोरोना काळात दिलेली मदत मतदारांच्या स्मरणात राहिली.
- तरुणांचा कौल: लहू बालवडकर यांच्या अनुभवापेक्षा अमोल बालवडकर यांच्या 'तरुण आणि आक्रमक' नेतृत्वावर मतदारांनी विश्वास दाखवला.
- सहानुभूतीचा फायदा: भाजपने तिकिट कापल्यानंतर अमोल बालवडकर यांच्याप्रती सहानुभूती निर्माण झाली होती त्याचा फायदा अमोल बालवडकर यांना झाला.
लहू बालवडकर यांच्यासारख्या नेत्याचा पराभव होणे, हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमोल बालवडकरांच्या या विजयामुळे अजित पवार गटाची ताकद पुण्यात अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लहू बालवडकर हे सर्वाधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांची भविष्यवाणी खोटी ठरल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.












Click it and Unblock the Notifications