पिंपरी-चिंचवडमध्ये 'पैलवाना'ची कोंडी? महेश लांडगेंसाठी धोक्याची घंटा वाजवणारे 'ते' ३ फॅक्टर!
PCMC election 2026 : 'आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका' अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्या थंडीतही उष्णता वाढली आहे. ही उष्णता निर्माण झाली आहे ती अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध महेश लांडगे (Mahesh Landge) या संघर्षामुळे.

एकेकाळी विकासाचे मॉडेल म्हणून मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता सत्तेच्या संघर्षापेक्षा अस्तित्वाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापालिकेच्या 'कर्जबाजारी' तिजोरीचा पाढा वाचत थेट आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भोसरीच्या 'पैलवाना'ला त्यांच्याच बालेकिल्ल्यात चितपट करण्यासाठी विरोधकांनी चक्रव्यूह रचला असून, स्थानिक प्रश्नांचा वाढता रोष आणि भाजप प्रदेशाध्यक्षांना स्वतः बचावासाठी मैदानात उतरावे लागणे, हे महेश लांडगे 'डेंजर झोन'मध्ये असल्याचे स्पष्ट संकेत मानले जात असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात वर्चस्व गाजवणाऱ्या लांडगेंची पकड यामुळे सैल होणार का? असे प्रश्न उपस्थित होस असून महापालिकेची निवडणूक त्यांच्यासाठी सर्वात कठीण परीक्षा ठरणार आहे.
१. कर्जाचा बोजा आणि 'श्रीमंती'ला लागलेला ओहोटीचा डाग
अजित पवारांनी एका पत्रकार परिषदेत आणि जाहीर सभेत महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर थेट बोट ठेवले. "ज्या महापालिकेच्या तिजोरीत कधी काळी मुबलक निधी होता, ती आज कर्जबाजारी कशी झाली?" असा टोकदार सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिकेवरील कर्जाचा मुद्दा थेट सामान्य मतदारांच्या मनाला भिडवण्यात पवार यशस्वी झाले असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाढीव प्रॉपर्टी टॅक्स या मुद्द्यांनी मध्यमवर्गीय मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे, ज्याचा थेट फटका लांडगे यांच्या नेतृत्वाखालील भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२. भोसरीचा गड आणि मूलभूत समस्यांचा विळखा
महेश लांडगे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातच आता असंतोषाचे वारे वाहू लागले आहेत. भोसरी गावठाणातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आता लांडगे यांच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. या परिसरातील नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर प्रामुख्याने खाली प्रश्न आणि समस्या अधोरेखित झाल्या.
- वाहतूक कोंडी: तासन् तास अडकून पडणारे नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत.
- पाणीप्रश्न आणि अस्वच्छता: मूलभूत सुविधांचा अभाव हा कळीचा मुद्दा बनला आहे.
- अतिक्रमण: अनधिकृत बांधकामे आणि फेरिवाल्यांचा प्रश्न हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांनी या स्थानिक समस्यांचे भांडवल करून, "दिसतं तसं नसतं" असा प्रचार करायला सुरुवात केली आहे.
३. प्रदेशाध्यक्षांची 'एन्ट्री': ताकद की सावरून घेण्याची धडपड?
या वादात सर्वात रंजक वळण तेव्हा आले जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना स्वतः मैदानात उतरावे लागले. "पैलवानाच्या नादाला लागायचं नसतं," असा इशारा त्यांनी अजित पवारांना दिला खरा, पण राजकीय विश्लेषकांच्या मते, ही बचावात्मक खेळी असू शकते.
विश्लेषण: स्थानिक पातळीवर लांडगे स्वतःला सावरू शकतील की नाही, अशी शंका पक्षश्रेष्ठींना आल्यानेच प्रदेशाध्यक्षांना पुण्यात धाव घ्यावी लागली का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. लांडगेंच्या बचावासाठी थेट राज्याचे नेतृत्व मैदानात उतरणे, हे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे द्योतक मानले जात आहे असा अंदाज काही तज्ञांनी लावायला सुरूवात केली आहे.
मैदान मारणार की पिछाडीवर पडणार?
सध्याच्या घडीला पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी मांडलेला कर्जाचा मुद्दा आणि स्थानिक प्रश्नांवरून होणारी कोंडी यामुळे महेश लांडगे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपने जरी ताकद लावली असली, तरी आगामी काळात हे चित्र बदलते की लांडगे या चक्रव्यूहात अडकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications