पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ! दीड वर्षाच्या लेकराला मागे सोडून आईची आत्महत्या
पिंपरी-चिंचवड शहरात वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पाच लाख रुपये हुंड्याची मागणी, मोटारसायकलसाठी होणारा तगादा आणि पतीच्या दारु पिऊन सततच्या मारहाणीला कंटाळून किरण दामोदर (वय २६) या विवाहित महिलेने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.

दीड वर्षांच्या बाळाला मागे सोडून मातेची जगातून एक्झिट
किरणचा पती आशिष दामोदर हा तिला सतत दारू पिऊन शिवीगाळ करत आणि मारहाण करत असे. तसेच, व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तो तिच्याकडे तगादा लावत होता. या त्रासाला कंटाळून किरणने शेवटी १७ जुलैच्या मध्यरात्री बोऱ्हाडेवाडी येथील ए.डी. बॅडमॅन बॅडमिंटन अकॅडमी जवळील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
किरण आपल्या दीड वर्षांच्या अधीर नावाच्या चिमुकल्या बाळाला मागे सोडून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. किरणने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा पती आशिषने तिला बेदम मारहाण केली होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी दुर्दैवी किरणचे वडील संजय दोंड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात किरणचा पती आशिष दामोदर, सासू सुनंदा दामोदर आणि सासरे दीपक दामोदर यांच्या विरोधात हुंडाबळी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आशिष दामोदरला तात्काळ अटक केली असून, त्याची आई सुनंदा आणि वडील दीपक यांचा शोध पोलिस घेत आहेत. किरणला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आशिष दामोदरवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी किरणच्या कुटुंबीयांनी केली आहे.












Click it and Unblock the Notifications