महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार? काय सांगतो फलोदी सट्टा बाजार; हा सट्टा नेमका काय आहे?
Maharashtra Assembly Election 2024- देशभरात प्रसिद्ध असलेला फलोदी सट्टाबाजार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही चर्चेत आला आहे. आज (बुधवारी) महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत असताना फलोदी सट्टाबाजारनेही आपले अंदाज सांगितले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकांचे एक्झिट पोल येण्यास काही तास शिल्लक असतानाच फलोदी सट्टाबाजारने त्यांचे पत्ते ओपन केल्याने एकच चर्चा रंगली आहे. फलोदी सट्टाबाजार नेमका काय आहे? त्याने महाराष्ट्रात कुणाची सत्ता येईल, असे अंदाज दिलेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न...

काय आहे फलोदी सट्टाबाजार?
फलोदी सट्टाबाजार हा नावाप्रमाणेच एक सट्टाबाजार आहे. महाराष्ट्रात जशी भेंडवळ प्रसिद्ध आहे. तसा राजस्थानात तो प्रसिद्ध आहे. भेंडवळ ही भविष्यवाणी वर्तवते. पीकपाणी, पाऊस, वर्षभर काय घडामोडी घडतील याचा अंदाज सांगते. त्याचप्रमाणे फलोदी सट्टाबाजार चालतो. राजस्थानमधील फलोदीत राजकारण आणि निवडणुकांचा सट्टा खुलतो. हा सट्टाबाजार यापूर्वी क्रिकेटमध्ये गुंतलेला होता. मात्र आता तो राजकीय रिंगणातही उतरला आहे.
महाराष्ट्राबाबत काय आहे अंदाज?
बुधवारी म्हणजेच आज महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांत एकाच टप्प्यात मतदान सुरु आहे. या पार्श्वभूमीवर फलोदी सट्टाबाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फलोदी सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. यापूर्वी फलोदी सट्टाबाजाराने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अंदाज वर्तवला होता. मात्र, हा अंदाज फेल ठरला होता.
कसा आहे सट्टाबाजारचा रेट
फलोदी सट्टा बाजाराने महाराष्ट्रात महायुतीला 288 पैकी 144 ते 152 जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज मांडला आहे. महाराष्ट्रात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज आहे. भाजपला 87 ते 90 जागा मिळू शकतात, असा फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी महायुतीवर 40 पैसे तर महाविकास आघाडीवर 2 ते 2.50 रुपयांचा भाव लागताना दिसत आहे.
झारखंडबाबतही वर्तवले अंदाज
आज झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. झारखंडमध्येही भाजपला 55 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज या फलोदी सट्टाबाजारने व्यक्त केला आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहेत. यापैकी 55 जागांवर मिळाल्यास भाजपला झारखंडमध्ये एकहाती सत्ता स्थापन करता येऊ शकते. त्यामुळे आता फलोदी सट्टा बाजाराचे हे अंदाज महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये कितपत खरे ठरणार, हे आता 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.












Click it and Unblock the Notifications