Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल केली अन् नस्ती उठाठेव भोवली! वाचा काय झालं
Uddhav Thackeray : न्यायालयाचा वेळ खूप अमूल्य आहे, हे माहित असतानाही अनेक जण साध्या-साध्या विषयावरून न्यायालयात याचिका दाखल करता. यात न्यायालयाचा वेळ खर्च होतो. अशाच एका याचिकाकर्त्याला न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
विशेष म्हणजे या याचिकाकर्त्याला आर्थिक फटकाही बसणार आहे. त्याला दोन लाख रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला. त्याने ही रक्कम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावी, असे आदेशही दिले.

काय आहे प्रकरण?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुजाऱ्याने दिलेली विभुती लावली नाही. त्यामुळे 'आमच्या समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या, असा आरोप करत नांदेडच्या एकाने ठाकरेंविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी. महेर यांनी याचिकाकर्त्यावर कडक ताशेरे ओढत दोन लाखांचा दंड ठोठावत तो ठाकरे यांना देण्याचे बजावले.
काय म्हटले होते याचिकेत
नांदेड येथील मोहन चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, चव्हाण यांचे पुजारी एका कार्यक्रमासाठी ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना 'प्रसाद' म्हणून मिठाई आणि विभूती देण्यात आली होती. मात्र, यावेळी ठाकरे यांनी ती विभूती कपाळावर लावण्याऐवजी शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला दिली.
यामुळे आमच्या समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत चव्हाण यांनी नांदेड येथील दंडाधिकारी व सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली होती. पण, ती तक्रार फेटाळण्यात आल्यानंतर चव्हाण यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर खंडपीठाने कडक ताशेरे ओढत निकाल देताना ती याचिका मागे घेण्याची याचिकाकर्त्याला परवानगी दिली.
ठाकरेंच्या घरी जावून द्या दंडाची रक्कम
ही याचिका म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर आणि प्रसिद्ध होण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर करण्याव्यतिरिक्त दुसरे काही नाही. बहुतांश वेळा अशा याचिका चुकीच्या हेतूने दाखल केल्या जातात. याचिकाकर्त्याने ठाकरे यांच्या नावाने डीडी (डिमांड ड्राफ्ट) खरेदी करावा, स्वतः त्यांच्या घरी जाऊन ते त्यांच्या हातात किंवा ज्या व्यक्तीला ते निर्देश देतात, त्यांच्यापर्यंत पोहोचवावे. ठोठावलेला दंड न भरल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील न्यायालयाने दिला आहे.(Uddhav Thackeray )












Click it and Unblock the Notifications