धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या- एकाच विषयावर कितीदा....
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये बिघडलेले राजकीय पर्यावरण लवकर दुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मिळून बीडमधील परिस्थिती सुधारतील, असे त्या म्हणाल्यात. तर पंकजा मुंडे यांनी यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देखील भाष्य केले आहे.
सुरेश धस म्हणाले- पंकजा मुंडे त्यांच्या भावाला पाठिशी घालत आहेत
भाजप आमदार सुरेश धस यांनी मंगळवारी देखील सरपंच परिषदेत बोलताना सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून पंकजा मुंडेंवर निशाणा साधला होता. पंकजा मुंडे या प्रकरणात धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पंकजा मुंडे यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी माझ्या छोट्या लेव्हलच्या विषयांना हाताळते. माझ्यापेक्षा मोठा अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी उत्तर देऊ शकत नाही. प्रस्तुत प्रकरणात महाराष्ट्रात सर्वप्रथम मीच एसआयटी लावण्याची मागणी केली होती. यासंबंधी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची कॉपी मी तुम्हाला देऊ शकते. त्याचबरोबर मी वेळोवेळी माझी भूमिका मांडलेली आहे. एसआयटी लावण्याची मागणी केली. नागपूरमध्ये मी याविषयावर देखील मी सविस्तरपणे बोलले आहे.
बीडमधील अधिकारी मी आणले का?
पंकजा मुंडे यांनी यावेळी बीडमधील अधिकारी मी एकटीने आणले आहेत का? असा सवालही उपस्थित केला. त्या म्हणाल्या, बीडमधील अधिकारी मी आणले आहेत का? तत्कालीन मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी हे अधिकारी आणले आहेत.
संतोष देशमुख माझा कार्यकर्ता होता?
संतोष देशमुख हा माझा कार्यकर्ता होता. त्यांच्या लेकरांचा चेहरा बघून मला काय वाटते? हे मला तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही. त्याचे जाहीर प्रदर्शन करण्याचीही गरज नाही. कोण अधिकारी कुणाचे, ते कुठून आणले? हा प्रश्न नाही. हे अधिकारी मी आणले का? तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व तत्कालीन यंत्रणेने हे अधिकारी आणले. ते सर्वजण आता या प्रकरणी चौकशीची मागणी करत आहेत. योग्य माणसाला शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे.
फडणवीस-पवार हे बीडची परिस्थिती बदलतील?
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मिळून बीडमधील स्थिती सुधारतील असे वाटते. या प्रकरणी माझी त्यांना सर्वस्वी साथ राहील. बीडमधील स्थिती बिघडली असे म्हणण्यास माझे मन जड होते. कारण, मी राज्यभरातील घटनांचा आढावा घेते. त्यावर आपण नंतर केव्हातरी बोलू. पण ते बिघडवण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार होऊ नये अशी माझी इच्छा आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलण्यास नकार
पंकजा मुंडे यांनी यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संभाव्य राजीनाम्यावर भाष्य करण्यासही नकार दिला. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मी उत्तर देऊ शकत नाही. या प्रकरणी त्यांच्या पक्षाचे नेते व या राज्याचे मुख्यमंत्री हे दोघेच उत्तर देऊ शकतात. मी प्रोटोकॉलवाईज फार लहान आहे. मंत्री असल्यामुळे मी कोणत्याही विषयाला थेटपणे उत्तर देऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.












Click it and Unblock the Notifications