पं. प्रदीप मिश्रा यांच्या कथेत चेंगराचेंगरी; एकाच दिवसांत दोनदा घडला प्रकार...
पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या मेरठ येथील शिवपुराण कथेत शुक्रवारी दुपारी चेंगराचेंगरी होण्याचा प्रकार घडला. या चेंगराचेंगरीत अनेक महिला आणि वृद्ध लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कथेचा आज सहावा दिवस असून उद्या शेवटचा दिवस आहे. दुपारी 1 वाजता कथा सुरू झाली होती.

कथेस एक लाख भाविक
पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या मेरठ येथील कथेच्या आजच्या सहाव्या दिवशी सुमारे एक लाख भाविक कथा श्रवण करण्यासाठी आले होते. जेव्हा कथा सुरू झाली तेव्हा लोक आत घाई करत होते. अचानक गर्दी वाढल्याने बाऊन्सर्सनी लोकांना आत जाण्यापासून रोखण्यास सुरुवात केली. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. शताब्दी नगरमध्ये सुरू असलेल्या या कथेला दररोज सुमारे दीड लाख लोक येत आहेत. त्यांच्यामध्ये अनेक व्हीव्हीआयपीही येत आहेत. अचानक गर्दी वाढल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येते.
दोन वेळा चेंगराचेंगरी
आजच्या कथेच्या सहाव्या दिवशी विक्रमी गर्दी झाली. सुमारे एक लाख भाविक कथा ऐकण्यासाठी आले होते. सकाळी साडेनऊच्य सुमारास व्हिआयपी पाससाठी गर्दी झाल्यानंतर काही वेळ चेंगराचेंगरी झाली. मात्र त्यानंतर सगळे सुरळीत झाले. त्यानंतर दुपारी एक वाजता पुन्हा चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीनंतर अनेक महिला गर्दीत दबल्या गेल्या. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कथेदरम्यान पोलीस आणि भाविकांमध्ये झटापटही झाली. घटनास्थळी 1000 पोलिस असून ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे.
कथेचा उद्या शेवटचा दिवस
मेरठ येथील श्री केदारेश्वर सेवा समितीच्यावतीने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत शिव महापुराण कथा सुरू आहे. दुपारी 1 ते 4 या वेळेत पंडीत प्रदीप मिश्रा ही कथा सांगत आहेत. या कथेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता, केदारेश्वर समितीकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी 7 वाहनतळ तयार करण्यात आले आहेत. शिवाय 1000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. छोटे हॉस्पिटल, शुद्ध पाणी, भोजन व इतर सुविधाही देण्यात येत आहेत. कथा मंडपात आणि परिसरात 5 हजार सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातूनही प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.












Click it and Unblock the Notifications