नव्या 15 जातींचा ओबीसीत समावेश; जरांगे पाटील पुन्हा संतप्त, म्हणाले- ओबीसी नेते आता झोपले आहेत का?
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यावर निर्णय होणे बाकी असतानाच राज्य सरकारकडून ओबीसींच्या यादीत नव्या 15 जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली. या बातमीनंतर मनोज जरांगे पाटील संतप्त झाले असून, सरकारसह त्यांनी ओबीसी नेते छगन भूजबळ यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला आहे.
मंत्रिमंडळात आज विक्रमी 80 निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही शेवटची बैठक होती. त्यात विक्रमी 80 निर्णय घेण्यात आले. अनेक महामंडळांची घोषणाही करण्यात आली. याच बैठकीत महाराष्ट्रातील 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या प्रस्तावालाही गती देण्यात आली. महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला. केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आहे. लवकरच या नव्या 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात येईल, अशी शक्यता आहे.

मनोज जरांगे सरकारवर संतप्त
राज्य सरकारने महाराष्ट्रातील 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी केली. शिवाय केंद्र सरकारकडे शिफारस प्रस्ताव दाखल केला. या बातमीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील संतप्त झाले. त्यांनी सरकार व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ओबीसींचे येवल्याचे नेते आता कुठे गेले..? मराठ्यांच्या बाबतीत सरकारचे डोळे गेले आहेत..? ओबीसी नेते आता झोपले आहेत का..? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला आहे, आत्ता या जातींना विरोध का नाही, असा टोलाही जरांगे यांनी भुजबळांचे नाव न घेता लगावला. शिवाय सरकारवही निशाणा साधला. मराठे आता शहाणे होतील. मराठ्यांचे डोळे उघडणे गरजेचं होते. सरकारने या जातींना ओबीसीत घेतांना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं आहे का..? असा संतप्त सवालही जरांगे यांनी सरकारला विचारला.
ओबीसीत समाविष्ट होतील या १५ जाती
सरकारने शिफारस केलेल्या 15 जाती अशा आहेत- बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, पोवार किंवा भोयार किंवा पवार, कपेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंताररेड्डी, रुकेकरी, लोध किंवा लोधा किंवा लोधी आणि डांगरी.












Click it and Unblock the Notifications