तर जीभ काढून हातात देण्याचं सामर्थ्य 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे, जरांगेंना सर्वात मोठा इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये आता नवा वाद सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या आरोपांवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

नेमकं काय घडलं?
रविवारी बीड येथे झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपने केला आहे. या आरोपानंतर सोशल मीडियावर भाजप नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. याच वादात आता नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी जरांगे पाटलांना थेट इशारा दिला आहे, "जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच माता-भगिनींचा आदर केला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीची लढाई लढावी, पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल कोणीही अपशब्द उच्चारत असेल तर ती जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे, हे जरांगे पाटलांनी लक्षात ठेवावं," असं राणे म्हणाले.
जरांगे पाटील यावर काय म्हणाले?
या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "मी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल काहीही बोललो नाही. पण जर बोलण्याच्या ओघात माझ्या तोंडातून तसा शब्द गेला असेल तर तो मी परत घेतो. फक्त देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं," असं ते म्हणाले.
त्यांनी पुढे म्हटले, "ज्या पोलिसांनी आमच्या आया-बहिणींना मारले, त्यांना तुम्ही मोठी पदं दिली. तुमची आई तुम्हाला प्रिय आहे तशीच आम्हाला आमची आई प्रिय आहे. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, आम्ही तुमच्या आईची पूजा करू."
या आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये तणाव वाढला असून, आता जरांगे पाटील नितेश राणेंच्या इशाऱ्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.












Click it and Unblock the Notifications