काका-पुतण्यामध्ये पुन्हा जवळीक? सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य आणि 10 जूनची प्रतीक्षा
राज्याच्या राजकारणात सध्या पावसापेक्षाही अधिक चर्चा "राजकीय मेघगर्जने"ची आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, यावर चर्चा रंगत असतानाच, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका-पुतण्यांमधील दुरावा संपणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात गाजतोय. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी दिलेलं सूचक उत्तर पुन्हा एकदा चर्चेचं केंद्रबिंदू ठरत आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या - निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा 10 जून रोजी वर्धापन दिन साजरा होणार आहे. याच निमित्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत ऐकून घेतले जाईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय होईल." यावरून, पवार कुटुंबातील मतभेदांवर पडदा टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला काका-पुतणे एकत्र
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये सलोख्याची चिन्हं दिसू लागली आहेत. त्याला पुष्टी देणारी घटना म्हणजे 9 जून रोजी पुण्यात शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या सहकार क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमात हे दोन्ही नेते सहभागी होणार आहेत.
त्यांच्यासोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर या कार्यक्रमात चर्चासत्र होणार आहे.
दोन गटांचे वेगवेगळे वर्धापनदिन एकाच दिवशी
शरद पवार गटाचा वर्धापन दिन 10 जून रोजी सकाळी 10.10 वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे ध्वजारोहणाने सुरू होणार आहे. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 10.30 ते 1.10 या वेळेत पक्ष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर अजित पवार गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडी येथे होणार आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि इतर प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. पुणे शहराला पहिल्यांदाच या कार्यक्रमाचं यजमानपद मिळालं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
त्याच दिवशी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचाही वर्धापन दिन पुण्यातच साजरा होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये कोणते संकेत मिळतात आणि भविष्यात काही एकत्रित हालचाल होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications