NCPचे आजपासून दोन दिवसीय शिर्डीत अधिवेशन, छगन भुजबळ सहभागी होणार का, राजकीय वर्तुळात चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिर्डी येथे 18 व 19 जानेवारी रोजी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात पक्षाचे राज्यातील सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थिती लावणार आहेत.
सध्या वादात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे आणि नाराज असलेले छगन भुजबळ हे देखील या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. खरच छगन भुजबळ या व्यासपिठावर येतील का, अशी चर्चा रंगली आहे. जर ते आले तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांची पहिल्यांदाच भेट होणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यामध्ये चांगले यश प्राप्त झाले आहे. त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील पक्षाला चांगले यश मिळावे, यासाठी या अधिवेशनात विचार मंथन होणार आहे.
आगामी निवडणुकांबाबत पक्षाचे धोरण ठरवण्यासाठी देखील ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अधिवेशनाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहेत.
धनंजय मुंडे यांची उपस्थिती
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि या हत्यात वाल्मीक कराडचा असलेला संबंध, या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत.
राज्यभरात मोर्चाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी केली जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे अधिवेशन उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भुजबळ-अजित पवारांची पहिल्यांदाच भेट
राज्य मंत्रिमंडळ स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. ते अधिवेशनाला उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशनामध्ये छगन भुजबळ काय बोलतात? याकडे देखील सर्वाचे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळ हे नाराज असून या आधी देखील त्यांनी पक्षाच्या विरोधात थेट आरोप केले होते. त्यामुळे आता अधिवेशनात छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारानंतर छगन भुजबळ आणि अजित पवार यांची देखील पहिल्यांदाच भेट होणार आहे.












Click it and Unblock the Notifications