आंडू-पांडू खूप पाहिले! एकेकाला घरात घुसून मारु, नारायण राणेंची पोलिसांसमोर मविआ कार्यकर्त्याना धमकी
राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरुन कुरघोडी करत आहेत. दरम्यान राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण सुरु झालं आहे. आज महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आले तेव्हा राडा झाला. यादरम्यान नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांसमोरच उघड धमकी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी राजकोट किल्ल्याला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचा ठाकरे गट व भाजप नेते नारायण राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले.

वडेट्टीवार-राणेंचे हस्तांदोलन..
भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास राजकोट किल्ल्यावर आले. त्यावेळी त्यांच्यासोबत नीलेश राणेही होते. दरम्यान यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही तेथ आले होते. नारायण राणे यांच्याशी त्यांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर राणे पुढे निघून गेले.
काय घडला प्रकार?
आदित्य ठाकरे ज्यावेळी राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आले त्यावेळी नारायण राणे समर्थकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांनीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. यामुळे किल्ल्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला. या स्थितीतच आदित्य ठाकरे यांनी किल्ल्यावर जाऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी नीलेश राणे यांनी पोलिसांविरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली.
नारायण राणेची धमकी, काय म्हणाले ...
नारायण राणे यांनीही यावेळी आक्रमक भूमिका घेत आम्ही या भागातील आहोत. बाहेरचे येथे येऊन दादागिरी करत असतील आणि पोलिस त्यांना संरक्षण देणार असतील तर आम्ही येथून अजिबात हलणार नाही. काय करायचे ते करा. आम्हाला गोळ्या घाला. असले आंडू-पांडू आम्ही खूप पाहिले. त्यानंतर मविआच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून ठार मारु असे म्हणत पोलिसांसमोर राणे नारायण यांनी धमकावले.
कोंबड्या अन् पेग्विन..पेग्विन..
हा गोंधळ सुरु असतानाच नीलेश राणे यांनी पोलिसांनी मला समजावून सांगू नये. आम्ही स्थानिक आहोत असे म्हणत आधी आदित्य ठाकरे यांना बाहेर काढा ते आमच्यानंतर आले अशी मागणी केली.दरम्यान ठाकरे कार्यकर्ते व राणे समर्थक यांच्यात बाचाबाची सुरू झाली. यावेळी राणे समर्थकांनी पेंग्विंन -पेंग्विंन अशी तर आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांनी आम्ही कोंबड्या घेऊन आलो नाहीत असं म्हणत राणेंना टोला लगावला.












Click it and Unblock the Notifications