हृदयद्रावक! सरपंचपदाच्या खुर्चीसाठी पोटच्या 7 वर्षांच्या मुलीचा बळी! बापानेच लेकीला कॅनॉलमध्ये फेकले
Nanded Crime News Father Kills 7-Year-Old Daughter : राजकारणाची हाव आणि वैयक्तिक स्वार्थ माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतो, याचा अंगावर काटा आणणारा प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. मुखेड तालुक्यातील केरूर येथील एका पित्याने आपल्या ७ वर्षांच्या चिमुकलीची तेलंगणा राज्यातील कॅनॉलमध्ये फेकून हत्या केली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत 'तिसरे अपत्य' अडसर ठरू नये, याच कारणातून हा बळी घेतल्याची प्राथमिक चर्चा परिसरात सुरू आहे.

नेमकी घटना काय?
आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर येथील रहिवासी असून त्याचे बाऱ्हाळी येथे हेअर कटिंगचे दुकान आहे. त्याला तीन मुले आहेत. तीन दिवसांपूर्वी 'साहित्य खरेदीसाठी जातो' असे पत्नीला सांगून तो आपली ७ वर्षांची मुलगी प्राची हिला सोबत घेऊन घराबाहेर पडला. मात्र, घरी परतताना तो एकटाच आला. दरम्यान, तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरातील बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये एका चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
असा लागला छडा
तेलंगणा पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवली. तांत्रिक तपास आणि संशयावरून पोलिसांनी ३० जानेवारी रोजी मुखेड शहरात येऊन पांडुरंगला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मुलीला कॅनॉलमध्ये फेकल्याची कबुली दिली.
हत्येचे कारण काय? दोन चर्चांनी उधाण
पांडुरंगने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत दोन तर्क लावले जात आहेत..
१. निवडणुकीचा अडसर: प्राप्त माहितीनुसार आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, पांडुरंग आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी इच्छुक होता. मात्र, नियमानुसार तिसरे अपत्य असल्यास निवडणूक लढवता येत नाही. या नियमाच्या भीतीने त्याने आपल्या तिसऱ्या अपत्याचा (प्राचीचा) काटा काढल्याची चर्चा गावात रंगली आहे.
२. आर्थिक विवंचना: असेही बोलले जात आहे की, पांडुरंग आर्थिक अडचणीत असल्याने नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचेही बोलले जात आहे.
संशियताला अटक, तपास सुरु
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात हृदय पिळवटून जाईल अशी घटना घडली असून पोटच्या पोरीची थोडीही दया-मया या पित्याला आली का नसावी असा सवाल विचारला जात आहे. या प्रकरणी संशयित पित्याला तेलंगणा पोलिसांनी अटक केली असून, हत्येचे नेमके कारण काय याचा अधिकृत तपास पोलिस करत आहेत, तसेच सरपंच होण्याचा हव्यास आणि आर्थिक विवंचना या दोन्ही बाजूने पोलिस तपास सुरु असून पुरावेही गोळा केले जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.
हेही वाचा : ऐकावे ते नवलच! चक्क 'भूता'वर गुन्हा दाखल; पाकिस्तानातील 'या' घटनेने सर्व चक्रावले, नेमकं प्रकरण काय?












Click it and Unblock the Notifications