ऐकावे ते नवलच! चक्क 'भूता'वर गुन्हा दाखल; पाकिस्तानातील 'या' घटनेने सर्व चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Jinn kidnapping case Pakistan : जगभरात गुन्हेगारीच्या अनेक विचित्र घटना आपण ऐकतो, पण पाकिस्तानच्या रावळपिंडी जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. एका 11 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाप्रकरणी चक्क एका 'जिन्'वर (आत्मा किंवा भूत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अजब दाव्यामुळे केवळ पोलीस प्रशासनच नाही, तर संपूर्ण कायदेशीर व्यवस्था पेचात पडली आहे.

नेमकी घटना काय?
रावळपिंडीच्या छावणी परिसरात राहणारा ११ वर्षांचा मुलगा २१ जानेवारी रोजी अचानक घरातून गायब झाला. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु मुलाचा कोठेही पत्ता लागला नाही.
१० दिवस उलटून गेल्यानंतरही मुलगा न परतल्याने हताश झालेल्या वडिलांनी अखेर तक्षशिला पोलीस ठाणे गाठले. मात्र, त्यांनी दिलेली तक्रार ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.
वडिल म्हणाले मुलाला भूताने पळवले
मुलाच्या वडिलांनी नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालात (FIR) असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलाला कोणत्याही माणसाने नाही, तर 'जिन्' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलौकिक शक्तींनी पळवून नेले आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार, या जिन्नांनी यापूर्वीही मुलाचे अनेकदा 'अपहरण' केले होते. पूर्वी मुलगा काही काळानंतर स्वतःहून घरी परतत असे. यावेळी मात्र १० दिवस उलटले तरी तो परत न आल्याने वडिलांनी औपचारिकपणे जिन्नाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
कायदेशीर प्रक्रियेत अंधश्रद्धेचा शिरकाव?
पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचे दावे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 'एआरवाय न्यूज'च्या वृत्तानुसार, यापूर्वीही लाहोरमध्ये एका महिलेने आपल्या मुलीच्या बेपत्ता होण्यामागे जिन्नाचा हात असल्याचे सांगत गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण इतके गाजले की लाहोर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आलिया नीलम यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चक्क विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
धक्कादायक वास्तव
६ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका महिलेचा शोध घेण्यासाठी लाहोर पोलिसांनी स्थापन केलेल्या SIT चे नेतृत्व डीआयजी झीशान रझा यांनी केले होते. अंधश्रद्धा आणि कायदेशीर प्रक्रिया यांच्यातील हा संघर्ष पाकिस्तानमध्ये वारंवार चर्चेचा विषय ठरत आहे.
पोलीस आता काय करणार?
सध्या रावळपिंडी पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक आणि मानवी दृष्टिकोनातून तपास करत आहेत. जरी एफआयआरमध्ये जिन्नाचा उल्लेख असला, तरी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे मुलाचा शोध घेत आहेत. मात्र, सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, "आता पोलीस एका अदृश्य आरोपीला बेड्या कशा ठोकणार?" असा उपरोधिक सवाल विचारला जात आहे.












Click it and Unblock the Notifications