पतीची बंडखोरी अन् पत्नीचा घरत्याग! नागपुरात पक्षनिष्ठेसाठी माजी महिला महापौरांनी मोडला संसार
Nagpur civic elections : राजकारणात सत्ता आणि पदासाठी पक्षांतराच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, परंतु नागपुरात पक्षनिष्ठेसाठी एका महिलेने चक्क आपल्या पतीचे घर सोडल्याची धक्कादायक आणि तितकीच चर्चेची घटना समोर आली आहे. नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी आपल्या पतीच्या भाजपविरोधी भूमिकेमुळे 'नांदते घर' सोडून माहेराची वाट धरली आहे. या घटनेने नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
सध्या राज्यात मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नागपुरातही राजकीय वातावरण तापले आहे. भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी नाट्य सुरू असताना, प्रभाग क्रमांक १७ मध्ये पेच निर्माण झाला. या प्रभागातून भाजपने काँग्रेसमधून पक्षात आलेल्या मनोज साबळे यांना उमेदवारी दिली.
या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर प्रचंड नाराज झाले. त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पतीच्या या निर्णयामुळे माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्यासमोर 'पती की पक्ष?' असे मोठे धर्मसंकट उभे राहिले होते.
पक्षनिष्ठा ठरली सर्वोच्च!
अर्चना डेहनकर यांनी या पेचप्रसंगात भावनांपेक्षा कर्तव्याला आणि पक्षनिष्ठेला महत्त्व दिले. भाजपने आपल्याला महापौरपदासारखी महत्त्वाची जबाबदारी दिली, त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणाऱ्या पतीला साथ देणे आपल्याला मान्य नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. पतीवर दबाव निर्माण करण्यासाठी आणि आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांनी थेट घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या आपल्या भावाच्या घरी राहायला गेल्या आहेत.
"भाजपने मला २००९ ते २०१२ या काळात नागपूरचे महापौरपद दिले, महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद दिले. पक्षाने मला ओळख दिली, त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणे माझ्या तत्त्वात बसत नाही. म्हणूनच मी घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे." - अर्चना डेहनकर, माजी महापौर
कोण आहेत अर्चना डेहनकर?
अर्चना डेहनकर या नागपूर भाजपमधील एक अनुभवी आणि ज्येष्ठ नाव आहे. त्यांच्या राजकीय प्रवासातील काही महत्त्वाचे टप्पे आहेत.
- महापौर पद: २००९ ते २०१२ या काळात त्यांनी नागपूरचे महापौरपद भूषवले.
- नगरसेविका: १९९७ आणि २००७ अशा दोन वेळा त्या महापालिकेत निवडून आल्या आहेत.
- संघटन: त्यांनी भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले आहे.
2 जानेवारीकडे सर्वांचे लक्ष
अर्चना डेहनकर यांच्या या टोकाच्या पावलामुळे विनायक डेहनकर आपली बंडखोरी मागे घेणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २ जानेवारी आहे. तोपर्यंत विनायक डेहनकर माघार घेऊन पत्नीला पुन्हा घरी परत आणणार की आपली निवडणूक लढवण्यावर ठाम राहणार, याकडे संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications