विकृत एकतर्फी प्रेमाचा हिडीस चेहरा! विवाहित पुरुषाने विद्यार्थिनीला संपवले; आत्महत्येचा बनाव उघड
Nagpur Murder Case: मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गोधणी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. एका ३८ वर्षीय विवाहित पुरुषाने आपल्या शेजारी राहणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणीचा गळा दाबून खून केला. विशेष म्हणजे, हा खून नसून आत्महत्या आहे असे भासवण्यासाठी त्याने मृतदेह पंख्याला लटकवला होता. मात्र, वैद्यकीय अहवालाने आरोपीचा हा खोटा बनाव उधळून लावला आहे.

मैत्रीच्या नात्याला काळिमा
मृत प्राची खापेकर (२३) ही गोधणीतील राजलक्ष्मी सोसायटीत वास्तव्यास होती आणि बी.ए.चे शिक्षण घेत होती. ती आरोपी शेखर ढोरे (३८) याच्या पत्नीकडे शिवणकाम शिकण्यासाठी जात असे. याच ओळखीचा गैरफायदा घेत शेखरने प्राचीवर एकतर्फी प्रेम करण्यास सुरुवात केली. जेव्हा प्राचीला त्याच्या चुकीच्या हेतूची कल्पना आली, तेव्हा तिने त्याच्याशी बोलणे टाळले. हाच नकार शेखरच्या जिव्हारी लागला.
असा घडला थरार...
मंगळवारी सकाळी प्राचीच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधून शेखरने तिच्या घरात प्रवेश केला. त्यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर हिंसेत झाले आणि रागाच्या भरात शेखरने प्राचीचा गळा दाबून तिला संपवले. त्यानंतर हे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून त्याने अत्यंत चलाखीने प्राचीचा मृतदेह तिच्याच ओढणीने सिलिंग फॅनला लटकवला आणि तिथून पळ काढला.
तपासात खुनाचा पर्दाफाश
सुरुवातीला प्राचीच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना ही आत्महत्या वाटली होती. मात्र, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर सत्य समोर आले. शवविच्छेदन अहवालात प्राचीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आणि गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
आरोपी जेरबंद
संशयावरून पोलिसांनी शेखर ढोरेला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या शेखरने अखेर आपला गुन्हा कबूल केला आहे. मानकापूर पोलिसांनी त्याला अटक केली असून परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.












Click it and Unblock the Notifications