आधी पुणे, मग मुंबई आता नागपुरात हिट अँड रन! बसने वृद्धाला चिरडले
नागपूर - महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटना वाढतच असून पुण्यात अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या पोर्शे कारने दोघांचा जीव घेतला. त्यानंतर रविवारी मुंबईच्या वरळीत एका महिलेचा बळी गेला. आता नागपूरातही हिट अँड रनची घटना घडली असून यामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.
नागपुरात सायकलवरुन एक वृद्ध व्यक्ती जात होता. त्यावेळी मागून भरधाव बस आली व तिने यावृद्धाला चिरडले. अपघात एवढा भीषण होता की, या दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

असा घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात सायकलवरुन जात असताना सदर 60 वर्षीय वृद्धाला एका भरधाव बसने धडक दिली. जोरदार धडकेमुळे वृद्ध खाली कोसळला. त्यावेळी वृद्धासह त्याची सायकलही बसच्या चाकाखाली आली. त्यामुळे हा वृद्ध चिरडला गेला.
या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी या वृद्धाला मृत घोषित केले.
सीसीटीव्ही फुटेज आले समोर
घटनेनंतर पोलिस अपघातस्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाहून काही सीसीटीव्ही फुटेजल मिळवले. या फुटेजद्वारे आता संशयित बसचालकाचा शोध पोलिस घेत आहे. प्रथमदर्शनी वृद्धाला चिरडणाऱ्या बसची ओळख पटली आहे, मात्र बसचालकाचा शोध सुरू आहे.
24 तासांत हिट अँड रनच्या 2 घटना
नागपुरात यापूर्वीही हिट अँड रनची घटना घडली होती. पण गेल्या 24 तासांत तब्बल दोन हिट अँड रनच्या घटना घडल्या. वृद्धाला झालेल्या अपघातापुर्वी गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या परिसरात आणखी एक अपघात घडला. यात कारच्या धडकेत दिनेश खैरनार नावाच् तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये चालक फरार आहेत.
वरळीतही हिट अँड रन
रविवारी सकाळी एका भरधाव कारने वरळीतील मासे बाजारात लिलावासाठी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. कारच्या बोनटवर असलेल्या महिलेला फरफटत नेल्यानंतर महिला ठार झाली होती.
या दुर्घटनेनंतर कारसह चालकाने पलायन केले होते. दरम्यान, पोलिसांनी कारचालकाचा शोध घेतला.हिट अँड रन प्रकरणातील कार पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू होती. या कारमध्ये शिवसेना शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर होते.


Click it and Unblock the Notifications